Child Selling Racket | मुलाच्या विक्री प्रकरणी तिघांना अटक, मूल विकत घेतलेले दाम्पत्य पसार

बेळगाव: Child Selling Racket | मुलाच्या विक्री प्रकरणी राज्यातील तिघांना हुक्केरी पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडील मुलाला ताब्यात घेतले आहे. संगीता सोमा हम्मण्णावर ऊर्फ गवळी (वय- ४०, रा. माद्याळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), मोहन बाबाजी तावडे (वय-६४), संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पिरप्पा तळवार (वय-४५, दोघे रा. निवळी, जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना राजू मगदूम (रा. सुल्तानपूर, ता. हुक्केरी) यांचा राजू बसवाणी मगदूम यांच्याशी विवाह झाला होता. अर्चना हिचे हे दुसरे लग्न असून तिला पहिल्या पतीपासून एक मूल आहे. तसेच राजू मगदूम याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. मात्र, अर्चनाच्या मुलाची तब्येत चांगली राहत नव्हती. त्याला पोटाचा विकार असून शस्त्रचिकित्सा करायल हवी, असे संगीता सोमू हम्मण्णावर ऊर्फ गवळी हिने सांगितले.
तसेच अर्चनाच्या मुलाला दवाखान्यात दाखवूया, असे सांगत तिने मुलाला आपल्याकडे घेतले. मोहन बाबाजी तावडे, संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पिराप्पा तळवार यांचे परिचित असलेल्या दाम्पत्य नंदकुमार सीताराम डोर्लेकर, नंदिनी नंदकुमार डोर्लेकर (रा. वरवडे, ता. रत्नागिरी, महाराष्ट्र) यांना मुलाला साडेतीन लाख रुपयांना विक्री केली. विक्री करण्यात आलेल्या मुलाचे पैसे संगीता, मोहन आणि त्याची पत्नी संगीता यांनी वाटून घेतले.
या प्रकरणात संगीता गवळी, संगीता तावडे, मोहन तावडे यांना अटक करण्यात आली आहे. नंदकुमार डोर्लेकर, नंदिनी नंदकुमार डोर्लेकर (रा. वरवडे, ता. रत्नागिरी, महाराष्ट्र) यांचा पोलिस शोध घेत आहेत. बेळगावात गेल्या महिन्यात बालिका विक्रीचे एक प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर हुक्केरीतील आणखी एका प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
“हुक्केरी तालुक्यातील मुलाच्या विक्री प्रकरणाचे आणखी एक प्रकरण पुढे आले. त्यात तिघांना अटक करण्यात आली आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे. मुलाला पोलिसांनी संरक्षण दिले असून प्रकरणाची पाळेमुळे पोलिस खणून काढत आहेत”, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिली आहे.
Comments are closed.