IMPIMP

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray | राज ठाकरे अन् मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीचा नेमका अन्वयार्थ काय? अमित ठाकरेंचे राजकीय पुनर्वसन होणार?

devendra-fadnavis-raj-thackeray-2

मुंबई : Devendra Fadnavis Meet Raj Thackeray | विधानसभा निवडणूक निकालानंतर नुकतेच राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत सत्ताधारी महायुतीचा समाचार घेतला होता. दरम्यान आज (दि.१०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या भेटीत फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत राजकीय घडामोडींबद्दल चर्चा करत काही प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या राजकीय पुनर्वसनाचाही समावेश असल्याचे समजते. दादर-माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवलेल्या अमित ठाकरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे राजकीय पदार्पणाच्या पहिल्याच लढाईत त्यांच्या पदरी निराशा पडली. हीच संधी हेरून आता भाजपकडून अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ६ जागांवरील नियुक्ती विधानसभा निवडणुकीआधी करण्यात आली होती. तर अजूनही उर्वरीत ६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन राज यांच्यासोबत राजकीय युतीसाठी हात पुढे करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मनसे सोबत असेल तर महायुतीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे विरोधात जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरे यांना मागील काही निवडणुकांत सातत्याने अपयश आलं असलं तरी आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हीच बाब लक्षात घेत राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजप आग्रही आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांच्या महापालिकांच्या निवडणुकीत मनसेची साथ भाजपची ताकद वाढवणारी असणार आहे. त्यामुळे फडणवीसांकडून पुढाकार घेत प्रस्ताव ठेवले जात आहेत. तसेच आगामी काळात निवडणुकीला सामोरे जाताना विरोधकांच्या नॅरेटिव्हला खोडण्यासाठी राज ठाकरेंच्या भाषणांचा उपयोग केला जाऊ शकतो. राज ठाकरे आपल्या स्पष्ट भूमिकांमुळे जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेत असतात. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी महायुतीला राज ठाकरे आपल्यासोबत हवे असल्याचे म्हंटले जात आहे.