IMPIMP

Khed Crime News | तहसीलदारांनाच 10 लाखांची खंडणी मागितल्याने महसूल विभागात खळबळ, खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

खेड: Khed Crime News | तहसीलदार ज्योती देवरे (Jyoti Deore) यांच्याकडे १० लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी (Ransom Demand) महसूल खात्यात खळबळ उडाली आहे. याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत रेशन कार्डधारक महेश लक्ष्मण नेहरे यांनी १० लाखांची मागणी केल्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करावा असे म्हंटले आहे. त्याचबरोबर खेड तहसील कार्यालयात असलेल्या पुनर्वसन व रोजगार हमी योजनेचे अव्वल कारकून सुनील किसन नंदकर यांच्या चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.

रेशनकार्ड प्रकरण मिटवून घेण्यासाठी थेट तहसीलदारांकडे खंडणी मागण्यात आली. तहसीलदार यांनी तक्रार केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ज्योती देवरे यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रार अर्जानुसार तहसील कार्यालयात पुरवठा निरिक्षक अधिकारी यांच्या माध्यमातून रेशनिंग कार्ड देण्यात येतात. त्यांच्या निगरानित असलेल्या सन २०१५ ते २०२३ दरम्यानच्या रेशनिंग कार्डमधील एक कार्ड एका लाभार्थीला मिळाले.

ते देताना संबंधित अधिकारी यांनी ऑनलाइन ४ हजार रुपये घेऊन ते कार्ड दिल्याची तक्रार एका व्यक्तीने केली. त्याचा तपास करीत असताना तहसीलदार देवरे यांना काही कार्ड गहाळ झाल्याचे निदर्शनास आले.

असा प्रकार घडला आहे असे समजताच संपर्क करणाऱ्या व्यक्तीने तहसीलदार देवरे यांना मोबाईलवर मेसेज करून प्रकरण मिटवायचे असेल तर १० लाख रुपये द्या, असा तगादा लावला. तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी सबंधित प्रकरणाबाबत खेड पोलिसात लेखी तक्रार दिली आहे.