Manoj Jarange Patil On Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगे आक्रमक, पुरावे नष्ट केले जात असल्याचा व्यक्त केला संशय, म्हणाले ”सरकार आरोपींना सोडून देतंय की काय?”

बीड : Manoj Jarange Patil On Santosh Deshmukh Murder Case | मस्सजोग, बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पुन्हा एकदा मरगळ आल्याचे दिसत आहे. कोणतीही माहिती पोलिसांकडून मीडिया अथवा देशमुख कुटुंबियांना सुद्धा दिली जात नसल्याने शंका व्यक्त होत आहे. सरकार आणि पोलीस कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. मोजकाच तपास केला जात असून सखोल तपास करण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, यावरूनच आता मनोज जरांगे यांनी शंका व्यक्त केली आहे.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुख यांचे मारेकरी फरार असताना कोणाच्या घरी होते हे सगळे चार्जशीट मध्ये आले पाहिजे. यामधील मुख्य नेता कोण, कोणाच्या घरी राहिले याची चौकशी झाली पाहिजे.
ज्या ज्या पोलिसांनी यांना सहकार्य केले त्यांना अजून बडतर्फ केलेले नाही. उज्ज्वल निकम यांचीही अद्याप सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली नाही. आरोपींच्या संपत्तीची चौकशी का केली नाही, असे अनेक मुद्दे जरांगे यांनी उपस्थित केले.
मनोज जरांगे म्हणाले, वाल्मिक कराडला काहीच झाले नसताना त्याला आयसीयूमध्ये का ठेवले याचे उत्तर दिले पाहिजे. आम्हाला अशी शंका येत आहे की, सरकार हे आरोपी सोडून देऊ शकते.
जरांगे म्हणाले, या प्रकरणातील मधला बडा नेता कोण हे शोधा. दररोज काहीतरी पुरावे बाहेर येत आहे. बाकीच्यांना सहआरोपी का नाही केले. चौकशी करता आणि सोडून देता. यांचे करोडो रुपयांचे घोटाळे निघाले, पळून जाताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये सापडले. तरीही कारवाई होत नाही. त्यामुळे आम्हाला संशय येऊ लागले आहे की पुरावे नष्ट केले जात आहेत.
मनोज जरांगे म्हणाले, दररोज या संदर्भात अनेक पुरावे समोर येत आहे. खंडणी मागणारे हेच, खून करणारे सुद्धा हेच आहेत. जे आरोपी फरार होते, ते कुणाच्या तरी घरी होते. एकाने मोबाईल फेकून दिला. ज्या पोलिसांचा या प्रकरणाशी संबंध आहे त्या पोलिसांचे सीडीआर काढा. यामध्ये कोण बडा नेता आहे त्याला समोर आणा, अशी मागणी जरांगेंनी केली.
Comments are closed.