Pune Night Marathon 2024 | यंदाच्या ‘नाईट मॅरेथाॅन’ला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद ! रविवार 1 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता प्रारंभ होणार
पुणे : Pune Night Marathon 2024 | ३८वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन ‘नाईट मॅरेथाॅन’ असणार असून रविवार दि १ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता सणस मैदान येथून स्पर्धेचा प्रारंभ होईल. पहाटे ३.०० वाजता मुख्य मॅरेथाॅनला व पाहटे ३.३० वाजता अर्ध मॅरेथाॅनला सणस मैदान येथून फ्लॅग ऑफ करण्यात येईल. सकाळी ६.३० वाजता १० कि.मी, सकाळी ७.०० वाजता ५ कि.मी व सकाळी ७.१५ वाजता व्हीलचेअर स्पर्धा सुरु होऊन, सकाळी 8.३० वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सणस मैदान येथे होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जेष्ठ नेत्या खा. सुप्रिया सुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, खा.प्रा मेधा कुलकर्णी, आ. बापू पठारे, अॅड वंदना चव्हाण, रवींद्र धंगेकर, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले व उद्योगपती विशाल चोरडिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगरपालिकेतर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. ‘शाश्वत पर्यावरणासाठी पळा’ हे यंदाचे घोषवाक्य आहे.
यंदा सणस मैदान – सारसबाग – स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा – सिंहगड मार्ग – नांदेड सिटी व आत जाऊन परत अशी दोन फेऱ्यांची ४२.१९५ कि.मी ची पूर्ण मॅरेथाॅन व त्याच मार्गे एका फेरीची अर्ध मॅरेथाॅन संपन्न होणार आहे. यामध्ये १२,०००हून अधिक धावपटू धावणार असून त्यात सुमारे ८० परदेशी स्पर्धक आहेत. याशिवाय सेनादल, बी.ई.जी, ए.एस.आय, रेल्वे तसेच सरहद, कारगिल, आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन मधील विजेते महिला व पुरुष धावपटू हे देखील लक्ष वेधून घेतील.
या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून सुमारे २,५०० स्वयंसेवक, ५००हुन अधिक तांत्रिक अधिकारी, पोलीस व वाहतूक पोलीस, डॉक्टर राजेंद्र जगताप यांची डीझास्टर मॅनेज्मेंट, भारती विद्यापीठ, सिंम्बोयसिस, नवले हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल आदींचे २०० डॉक्टर, २५० नर्सेस, मार्गावर १०८ अॅम्ब्यूलंसेस , पाणी, एनर्जी ड्रिंक, स्पंजींगची सोय, भरपूर प्रकाश योजना आणि सणस मैदान येथे मिनी हॉस्पिटलची उभारणी आदी. तयारीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयातीलही शेकडो मुले स्पंजिंगची जबाबदारी समर्थपणे पार पाडतील.
या वर्षी सायकलोहोलिक्स संघटनेचे ५० सायकल पायलट स्पर्धा मार्गावर धावपटूना पायलटिंग करणार आहेत, पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे ५० राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पंच या स्पर्धेची तांत्रिक बाबी , अंतिम निकाल तयार करणे. इ. बाबी सांभाळतील तसेच इलेक्ट्रॉनिक टायमिंग सिस्टीम मॅट्स ,सेनसर्स सुध्दा स्पर्धा मार्ग आणि प्रारंभ ,टर्निंग पॉइंट , अंतिम रेषेवर लावली जातील.
शुक्रवारी बहुतेक परदेशी धावपटू पुण्यात पोहचले असून शुक्रवारी सायं. ५ नंतर सणस मैदान येथे या परदेशी महिला व पुरुष धावपटूंनी सराव केला. सहभागी सर्व गटातील खेळाडूंना टी-शर्ट, कॅप, चेस्ट नंबर देण्यात आले आहेत. पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर ठळकपणे नोंदवणाऱ्या या ‘नाईट मॅरेथाॅन’च्या स्वागतासाठी मार्गावरील सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी जरूर यावे असे आव्हान पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड आणि जाॅइंट रेस डायरेक्टर रोहन मोरे यांनी केले.