Pune Pimpri Chinchwad Crime News | पोटगीचा दावा करणाऱ्या पत्नीवर अघोरी कृत्य, गळ्याला कोयता लावत जबरदस्तीने अत्याचार; गुन्हा दाखल

पिंपरी: Pune Pimpri Chinchwad Crime News | विभक्त राहात असलेल्या पत्नीने कोर्टामध्ये पोटगीचा दावा दाखल केल्यामुळे पतीने अघोरी कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. तसेच पतीने पत्नीच्या गळ्याला कोयता लावत जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर हळदी-कुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी पत्नीच्या गुप्तांगात पिळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना विशाल नगर, पिंपळे निलख याठिकाणी १ जून २०२४ रोजी घडली. याबाबत ३६ वर्षीय पीडित महिलेने ११ एप्रिल २०२५ रोजी सांगावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी पती या दोघांचा २००४ मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. लग्नानंतर काही वर्षांतच आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात वाद व्हायचे. सातत्याने वाद होत असल्यामुळे २०२३ मध्ये पीडित महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बालेवाडी याठिकाणी राहण्यासाठी गेली.
तर, आरोपी पती दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला. परंतु, मुलांची वह्या, पुस्तके पतीच्या घरी राहिल्यानं ते आणण्यासाठी पीडित महिला पतीच्या घरी गेली. त्यावेळी पतीने पत्नीला शिवीगाळ केली. पतीने मद्यप्राशन केल्यामुळे पत्नीने काहीही प्रत्युत्तर दिले नाही. मी बोलतो तरी माझ्याकडे बघत नाही, असे म्हणत पतीने पत्नीच्या गळ्यावर कोयता ठेऊन तिच्यावर अत्याचार केला.
एवढ्यावर न थांबता पतीनं हळदी-कुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी आणल्या. त्यानंतर अघोरी कृत्य केले. मी तुझ्यावर जादूटोणा केला आहे. तू आता वेडी होणार आहेस. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझा मर्डर करतो’ अशी धमकीही त्याने दिली. हा भयंकर प्रकार घडल्यावर पीडित पत्नी कोणाला काही न बोलता आई आणि मुलांसह घरी गेली. तिने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने सांगवी पोलिसात तिने तक्रार दिली आहे. ‘या प्रकरणाचा महिला अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली आहे.