IMPIMP

Pune Police News | पुणे : तंबाखु, गुटखा खाताय तर 5000 रुपये तयार ठेवा; व्यसन करणार्‍या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार

पुणे : Pune Police News | गणवेशावर व कार्यालयात कोणाकडे गुटखा, तंबाखु, दारु, सिगरेट जवळ आढळून आल्यास पोलिसांवर तात्काळ शिस्तभंगाची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात येणार आहे.

पोलिसांमध्ये तंबाखुचे व्यसन करणार्‍यांची संख्या मोठी आहे. कार्यालयात असताना बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी हे तंबाखु, गुटखा खातात व त्याची पिंक कार्यालयाच्या भिंतीवर, बाथरुममध्ये, कार्यालयाचा परिसरात टाकत असतात. त्यातून पोलीस कार्यालयाचा परिसर खराब व घाण होतो. त्यामुळे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे (Rajkumar Shinde DCP) यांनी एका आदेश काढला आहे.

सर्व पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशात असताना पोलीस दलातील व इतर शासकीय कोणत्याही कार्यालयात जाताना येताना आपले जवळ गुटखा, तंबाखु, दारु, सिगरेट जवळ बाळगु नये. कार्यालयात असताना कोणीही गुटखा, तंबाखु खाऊन कार्यालयातील भिंतींवर, बाथरुममध्ये किंवा कार्यालयातील परीसरात थुंकू नये. गणवेशांवर सिगारेट ओढू नये, कोणी कार्यालयाच्या भिंतीवर, बाथरुममध्ये, परीसरात थुंकताना आढळून आल्यास संबधितांवर तात्काळ शिस्तभंगाची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात येईल.
तसेच गणवेशावर व कर्तव्यावर असताना कोणीही दारु प्यायलेला आढळून आल्यास संबंधित अधिकारी व अंमलदार यांच्यावर तात्काळ निलंबनाची व कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

या आदेशपत्राचे पोलीस ठाण्याकडील दैनंदिन हजेरीवेळी पुढील ५ दिवस सतत वाचन करुन सर्वांना अवगत करावे. तसेच पोलीस ठाण्याकडील नोटीस बोर्डावर व व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये प्रसारित करावे, असे या आदेशात म्हटले आहे.