IMPIMP

Pune Railway Station News | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; पुण्यासह ‘या’ १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री ४ दिवस राहणार बंद; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Platform Ticket

पुणेः Pune Railway Station News | नववर्षाच्या आगमनानिमित्त अनेक नागरिकांनी विविध ठिकाणी जाऊन तर काहींनी नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सेलिब्रेशनचे आयोजन केले आहे. दरम्यान वर्षाअखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रवाशांची प्रचंड गर्दी होण्याच्या शक्यता असल्याने मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. (Platform Ticket Sales Closed)

प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी चार दिवस म्हणजेच (दि.२) जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध लागू असेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

राज्यातील पुणे रेल्वे स्थानकासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, नागपूर, नाशिक, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर या १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.

मात्र, यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशांचा प्रवास सुलभ व्हावा, या हेतूने सदर निर्बंधांमधून विशेष सूट देण्यात येत आहे.