Sanjay Raut On Eknath Shinde | घरगडी असते तर त्यांना आमदार, मंत्री केलं असतं का? हा खोटारडा माणूस, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई : Sanjay Raut On Eknath Shinde | शिवसेना ठाकरे पक्षाचे लांजा-राजापूर मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर ठाकरे-शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. साळवी यांचे पक्षात स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. या टीकेला आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
माजी आमदार राजन साळवी यांनी काल उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांनंतर सहकार्यांना घरगड्यांसारखी वागणूक देण्यात आली अशी टीका केली होती.
शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले होते की, मी बाळासाहेबांबरोबर काम केले आहे. ते आपल्या सहकार्यांना सवंगड्यांसारखे वागवायचे. पण नंतर त्यांच्या पश्चात सहकार्यांना नोकर-घरगड्यासारखी वागणूक दिली गेली. त्यामुळेच या एकनाथ शिंदेला अडीच वर्षांपूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला आणि लोकांच्या मनातील सरकार आणावे लागले.
शिंदेंच्या या टीकेला उत्तर देताना आज संजय राऊत यांनी म्हटले की,
महायुतीच्या नेत्यांमध्ये तंगड्यात तंगडं घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी मला शहाणपणा शिकवू नये. एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ट मित्र आणि सहकारी होते. पण काय कराव, काय नाही हा शहाणपणा त्यांनी मला शिकवू नये. जे सरकार भ्रष्टाचारातून, गद्दारीतून निर्माण झालेय, त्या सरकारचे ते प्रमुख होते.
संपूर्ण न्यायव्यवस्था, निवडणूक यंत्रणा विकत घेऊन सरकार टिकवले आहे. तुम्ही प्रामाणिकपणे नव्हे तर पैशाच्या बळावर, खोटी कामे करून निवडणूक जिंकली आहे, असे राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेनी उठाव वगैरे काही केला नाही, ते ईडीला, सीबीआयला घाबरून पळालेत. ते जर घरगडी असते तर त्यांना आमदार केले असते का? तर त्यांना इतकी वर्ष मंत्रीमंडळात महत्वाची खाती दिली असती का? घरगडी असते तर नगरविकास खात्यासारखे महत्वाचे खाते मुख्यमंत्र्यांनी दिले असते का? असे प्रश्न राऊत यांनी विचारले.
शिंदेवर हल्लाबोल करताना संजय राऊत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री हे कधीच नगरविकास खाते सोडत नाही, फडणवीसांकडे पहा, त्यांनी सोडले का? पण जे नगरविकास खाते मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे, ते उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या जवळच्या सहकार्याला म्हणजे एकनाथ शिंदेंना दिले, एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे, असे राऊत म्हणाले. सत्ता हे सर्वस्व नाही, राजन साळवींसारखे लोक आहेत, त्यांना आम्ही गांडू म्हणतो, अशा शब्दांत राऊतांनी साळंवीवर देखील टीकास्त्र सोडले.
Comments are closed.