IMPIMP

Mahadev Munde Murder Case | बीडच्या महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी अपडेट! 5 सदस्यीय तपास पथकाची स्थापना, पत्नीच्या उपोषणाच्या इशार्‍यानंतर पोलिसांना जाग

February 13, 2025

बीड : Mahadev Munde Murder Case | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनानंतर (Santosh Deshmukh Murder Case) वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या टोळीची अनेक कृत्य बाहेर येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण होय. तब्बल पंधरा महिन्यापूर्वी परळी तहसील कार्यालयावर भर रस्त्यात महादेव यांच खून करण्यात आला होता, तरीही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने या खून प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत. महादेव मुंडे यांच्या पत्नीने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी 5 जणांचे तपास पथक नेमले आहे.

संतोष देशमुख खूनप्रकरणानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे खूनप्रकरणाला देखील वाचा फोडली होती. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोपींना अटक करण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तब्बल पंधरा महिने उलटूनही या खून प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत असतानाही पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. या मुळे बीड पोलिसांची मोठी बदनामी होत होती.

अखेर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पाचजणांचे पथक स्थापन करून तपासाचे आदेश दिले आहेत.

महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी नवनीत कॉवत यांनी स्थापन केलेल्या पथकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. एलसीबीचे पीआय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल या पथकात आहेत. दरम्यान, महादेव मुंडे यांचे मारेकरी वाल्मिक कराडच्या मुलाच्या सोबत असतात, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता.