IMPIMP

Buldhana Accident News | पत्नीसमोरच घडला विचित्र अपघात, डोळ्यादेखत पतीचा जीव गेला

December 13, 2024

बुलढाणा: Buldhana Accident News | धाड तालुक्यातील सावळी येथे गुरुवार (दि.१२) सकाळी ११ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. विलास किसन वाघ (वय- ४५) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राहुल भीमसिंह सुमारे, गोदाबाई संजय धनावत, अनिल फकीर सिंग कुटुंबरे अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा तालुक्यातील सावळी येथील विलास किसन वाघ (वय- ४५) हे दूचाकी क्रमांक एम एच २१ ४३९६ ने पत्नीसह करडी गावाच्या फाट्यावर आले. तेथे त्यांचे कृषी केंद्र असून ते पत्नीला सोडून दुचाकीने पेट्रोल भरण्यासाठी संभाजीनगर रोडने पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होते.

तेवढ्यात समोरून दूचाकी क्रमांक २१ बीपी ५८६६ अनिल फकीरसिंग कुटुंबरे, राहुल भीमसिंह सुमारे, गोदाबाई संजय धनावत हे येत होते. त्यांच्या गाडीने विलास वाघ यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या अपघातामध्ये विलास वाघ हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना स्थानिक नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तर, जखमी राहुल भीमसिंह सुमारे, गोदाबाई संजय धनावत या दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनिल फकीर सिंग कुटुंबरे यांची प्रकृती चिंताजन असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आल्याची माहिती आहे.

धाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार आशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय परमेश्वर केंद्रे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.