IMPIMP

Buldhana Accident News | स्कूटीने मायलेकी जाताना काळाचा घाला, आईच्या डोळ्यासमोर मुलीचा दुर्दैवी मृत्यू

February 11, 2025

बुलढाणा: Buldhana Accident News | स्कूटीवरुन जाणाऱ्या मायलेकीला पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मुलीचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अपघातात माऊलीच्या डोळ्यासमोरच लेकीने प्राण सोडले. स्नेहल चौधरी (वय-२४) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर छाया संदीप चौधरी (वय ५५ वर्ष) या गंभीर जखमी झाल्या आहेत. बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकात हा अपघात घडला. आरोपी पिकअप ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळगाव साखळी येथील छाया चौधरी आणि त्यांची मुलगी स्नेहल चौधरी या दोघी पोस्ट ऑफिसच्या कामासाठी सोमवार (दि.१०) दुपारी अंदाजे बारा वाजताच्या सुमारास बुलढाण्याच्या दिशेने येत होत्या. यावेळी महिंद्र पिकअप गाडी (क्रमांक एम एच २८ ए बी ११८८) या गाडीने चौधरी मायलेकीची स्कूटी नंबर (एम एच २८ झेड ८२४६) ला जोरदार पाठीमागून धडक दिली. त्यात स्कुटी चालवणारी स्नेहल खाली पडली आणि तिच्या डोक्याला जोराचा मार लागला. तिची आई सुद्धा स्कुटी वरुन खाली पडली. दोघींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान स्नेहलचा मृत्यू झाला. पोलिसांनी महिंद्रा पिकअप ड्रायव्हर सतीश भास्कर बाहेकर (वय-२६ वर्ष) यास तात्काळ ताब्यात घेतले. प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या दाव्यानुसार ड्रायव्हर सतीश हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्यावर या प्रकरणी बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.