IMPIMP

Talathi Arrested In Fake Farmers Scam | बनावट शेतकरी दाखवून कोट्यवधींचा निधी लाटणाऱ्या दोन तलाठ्यांसह एकजण ताब्यात

December 26, 2024

बुलढाणा: Talathi Arrested In Fake Farmers Scam | अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानीची मदत जाहीर करण्यात आली होती. असे असताना बनावट शेतकरी दाखवून शासनाकडून येणारा कोट्यवधींचा निधी तलाठ्यांनी मिळून लाटल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातुन समोर आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत असते. त्यानुसार अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास प्रशासनाकडून पंचनामे करून भरपाई देण्यात येत असते.

तर मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात अनेकांच्या शेतातील पिके वाहून गेली तर काहीच्या शेती खरडून गेल्या होत्या. संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत देण्यात येणार होती.

यासाठी तलाठ्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे मागविण्यात आली होती. मात्र तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माठे यांनी नुकसानग्रस्त बनावट शेतकरी उभे करून त्यांची नवे शासनाकडे पाठविण्याचा कारनामा केला होता. यात कोट्यवधीची अतिवृष्टीची मदत लाटल्याचे उघड झाले होते. तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माठे व संगणक चालक महादेव पाटील या तिघांनी एका ठिकाणी बसून नुकसानीचे सर्व्हे करीत जे शेतकरी नाहीत त्यांच्या नावाने कोट्यावधी रुपये शासनाकडून वसुल केले होते.

दरम्यान तत्कालीन तहसीलदार शीतल सोलट यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. यानंतर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली होती. बुलढाणा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान तिन्ही आरोपी ऑगस्ट महिन्यापासून फरार होते. मात्र चिखली तालुक्यातील रानंत्री येथून आरोपी तलाठी अनंता माठे याला ताब्यात घेतले. तर खामगाव मधून तलाठी आरोपी उमेश बिल्लेवार तर जळगाव जामोद मधून कॉम्प्युटर ऑपरेटर महादेव पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे. आता याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील चौकशी सुरु आहे.