Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | जिल्हा सत्र न्यायालयाच्या निवृत्त लिपिकाची निर्घृण हत्या, मुंडके नसलेल्या अवस्थेत विहिरीत आढळला मृतदेह; घटनेने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | पैठणच्या चिंचाळा परिसरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या निवृत्त लिपिकाची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस (वय-६५) असे हत्या झालेल्या निवृत्त लिपिकाचे नाव आहे. संबंधित लिपिकाचं मुंडकं छाटून त्यांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. पण काही वेळाने त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगू लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (Murder Case)
अधिक माहितीनुसार, नामदेव ब्रह्मराक्षस हे गेवराई न्यायालयात लिपीक म्हणून नोकरीस होते. अलीकडेच ते सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांची पैठण शिवारात शेत जमीन होती. शेतात घर बांधण्याच्या इराद्याने ते पत्नीसमवेत मंगळवारी छत्रपती संभाजीनगरहुन आपल्या गावी भावाकडे आले होते. दोन दिवस त्यांनी घर बांधण्याची जागा निश्चित करून परत छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा बेत आखला होता.
मात्र शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ते बेपत्ता झाले होते. सकाळी भाऊ आणि त्यांची पत्नी झोपेतून उठल्यानंतर त्यांना नामदेव ब्रह्मराक्षस बेपत्ता असल्याचे समजले. यानंतर त्यांनी तातडीने आपल्या भावाचा शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत मुंडके नसलेल्या अवस्थेत नामदेव यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळले.
त्यानंतर या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मुंडके नसलेला मृतदेह विहीरीबाहेर काढला. नामदेव यांची हत्या कुणी आणि कशासाठी केली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत.
Comments are closed.