IMPIMP

Dharashiv Crime News | बहिणीच्या कौटुंबिक वादात साक्षीदार होणं महागात पडलं, गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून तरुणाचा खून

February 7, 2025

धाराशिव : Dharashiv Crime News | सावत्र बहिणीसोबत असलेल्या कौटुंबिक वादात साक्षीदार असलेल्या २८ वर्षीय तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून केल्याची घटना समोर आली आहे. नितीन आरगडे (वय-२८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना लोहारा तालुक्यात (खुर्द) येथे गुरुवारी (दि.६) घडली. (Murder Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन आरगडे व राम रसाळ हे दोघे आज तलावातील पाण्यात विद्युत मोटार सोडण्यासाठी जात होते. यावेळी रावण देविदास रसाळ याने त्यांना अडवून कागदपत्रावर स्वाक्षऱ्या का केल्यास असे म्हणत नितीन आरगडे याच्यावर गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्या.

एक गोळी छातीत, तर दुसरी तोंडाजवळ लागल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर रावण रसाळ याने पोलिस ठाणे गाठून राम रसाळ याने खून केल्याची खोटी माहिती दिली. संशय आल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून केल्याचे कबूल केले. रावणचा सावत्र बहिणीबरोबर कौटुंबिक वाद सुरू असून, या वादात मृत नितीन आरगडे साक्षीदार होता.

याचाच राग मनात धरून रावणने खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार यांनी घटनास्थळाला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.