Hadapsar Pune Crime News | हडपसर: मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केल्याने ज्येष्ठाचे अपहरण करुन बेदम मारहाण; 7 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Hadapsar Pune Crime News | बहिणीच्या सासूबाईच्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केल्याने एकाचे अपहरण करुन त्याला डांबून ठेवून मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोपट बबन शेंडकर (वय ५५, रा. फातिमानगर), सौरभ पोपट शेंडकर (वय २४), सुनिल किसन शेंडकर (वय ४१, रा. फातिमानगर), समीर रामदास शेंडकर (वय ३८, रा. आझादनगर, वानवडी), गणेश रामदास शेंडकर (वय ३३), महेश दत्तात्रय शेंडकर (वय ३३), विघ्नेश ज्ञानेश्वर शेंडकर (वय १९, रा. धाडगेनगर, फातिमानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत दिलीप बबन इंगळे (वय ५६, रा. काळे पडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ४ जून २०२४ रोजी रात्री दहा वाजता घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण सुशिला जयसिंग शेंडकर यांच्या सासूबाई तुळसाबाई बबन शेंडकर यांनी महम्मदवाडी येथील ६ गुंठे जागेचे मृत्युपत्र तयार केले. त्यात ही जागा जयसिंग शेंडकर याच्या नावे केली. या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून फिर्यादी यांनी सही केली होती. जयसिंग शेंडकर याने ही जागा तुळसाबाई शेंडकर यांना फसवून घेतली असल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. त्यामुळे फिर्यादी यांच्या साडेसतरानळी येथील साईटवरुन आरोपींनी जबरदस्तीने इर्टिगा कार मध्ये बसविले. त्यांचे अपहरण करुन त्यांना जयसिंग शेंडकर यांच्या घरी नेले. तेथे त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादीच्या पाठीला व मणक्याला दुखापत झाली. फिर्यादीचे दाजी जयसिंग शेंडकर यांनाही मारहाण केली़ त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हाईस रेकॉर्डिग त्यांनी डिलिट करुन मोबाईल फोडला. सहायक पोलीस निरीक्षक हसिना शिकलगार तपास करीत आहेत.