IMPIMP

Kaij Beed Crime News | पाहुण्यांच्या घरी जेवायला बोलावून काढला काटा, प्रेमप्रकरणातून विवाहित तरुणाचा खून, अपघाताच्या बनावासाठी मृतदेह महामार्गावर फेकला

February 4, 2025

केज: Kaij Beed Crime News | बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील विवाहित तरुणाला प्रेमप्रकरणातून पाहुण्याच्या घरी जेवणाच्या बहाण्याने बोलावून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह महामार्गावर फेकून देण्यात आला. मुस्तकिन जब्बार शेख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तकिन शेख हा धाराशिव जिल्ह्यातील (मोहा, ता. कळंब) येथे एका मस्जिदमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे काम करीत आहे. मुस्तकिन शेख याचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा व मुलगी आहे. परंतु, त्याची पत्नी व त्याचे पटत नसल्याने ते दोघे विभक्त राहत होते. दरम्यान, मुस्तकिन शेख याचे पुणे येथे मूळची बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील असलेल्या एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली. त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले.

मात्र, त्यांचे हे संबंध त्या महिलेचे वडील आणि भाऊ यांना मान्य नव्हते. याबाबत दोघांच्याही घरच्यांनी त्यांना समजावून सांगितले. मात्र, त्यांनी त्यांचे ऐकले नाही. दरम्यान, मुस्तकिन शेख याने त्याच्या आई-वडिलांना ते दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले होते. यामुळे त्या महिलेचे वडील सरदार शेख व भाऊ अकबर शेख यांनी मुस्तकिन शेख याला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली असल्याचे त्याने त्याच्या वडिलांना सांगितले होते.

दि.२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८:३० वाजताच्या सुमारास मुस्तकीन शेख याने त्याच्या आईला सांगितले की, तो मौजे गोजवाडा येथे सरदार शेख व अकबर शेख यांनी त्यांच्या बहिणीच्या घरी मेजवाणी आयोजित केली आहे. मी दोन तासांमध्ये परत येतो, असे सांगून फोन ठेवला. त्यानंतर त्या महिलेचे वडील सरदार शेख, भाऊ अकबर शेख, दुसरा भाऊ व त्याचा मेव्हणा या चौघांनी (दि.२) रात्री १२ वाजता मुस्तकिन शेख याचा खून करून त्याचा मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर फेकून अपघात घडल्याचा बनाव केला.

मृत मुस्तकिन याच्या खून प्रकरणी त्याचे वडील जब्बार शेख यांच्या तक्रारीवरून (दि.३) वाशी, जि. धाराशिव पोलीस ठाण्यात सरदार शेख, त्याचा मुलगा अकबर शेख दुसरा मुलगा आणि त्यांचा मेव्हणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले तपास करीत आहेत.