Kolhapur Crime News | देवदर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा कुटुंबीयांच्या डोळ्यादेखत मृत्यू

Kolhapur Crime News | A young man who went for a visit to God died in front of his family.

कोल्हापूर : Kolhapur Crime News | कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यात देवदर्शनासाठी गेलेल्या एका तरुणाचा कुटुंबीयांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला आहे. देवदर्शन घेतल्यानंतर हे कुटुंब विश्रांती घेण्यासाठी एकेठिकाणी थांबले होते. येथेच अनर्थ घडून तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरोळ पोलिस ठाण्यात झाली.

नरेंद्र अप्पासाहेब माने असे मृत पावलेल्या ३८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो कुरुंदवाडच्या कोरवी गल्लीत वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी तो आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे देवदर्शनासाठी गेला होता. देवाचे दर्शन घेतल्यानंतर हे कुटुंब विश्रांतीसाठी काही वेळ नदीच्या किनारी थांबले. या वेळी उन्हाचा पारा वाढत असल्याने नरेंद्रने नदीत उतरून पोहण्याचा निर्णय घेतला. आंघोळीसाठी पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

हा प्रकार त्याच्या कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने आरडाओरडा करत मदतीसाठी लोकांना बोलावले. बचाव पथकलाही माहिती देण्यात आली. काही वेळात बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने शोधमोहीम राबवत तासाभरात नरेंद्रला पाण्यातून बाहेर काढले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.