Porsche Car Accident Pune | पोर्शे कार अपघाताची सुनावणी लवकरच सुरु होणार; गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तांची माहिती

पुणे : Porsche Car Accident Pune | शहरातील कल्याणीनगर येथे बड्या बिल्डरच्या मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगात त्याच्या जवळील पोर्शे कार चालवून दुचाकीवर निघालेल्या तरुण-तरुणीला उडविले होते. यामध्ये दोघे इंजिनिअर असलेल्या तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. या प्रकरणात बाल न्याय मंडळाचा निर्णय, रक्त नमुने तपासणी, ससूनच्या डॉक्टरांचा प्रताप, अल्पवयीन मुलाच्या आजोबांसह आई-वडिलांना झालेली अटक अशा अनेक नाट्यमय घडामोडी समोर आल्या होत्या.
आता या प्रकरणाची न्यायालयात लवकरच सुनावणी सुरू होणार आहे. एका प्रकरणाची सुनावणी बाल न्यायालयात, तर दुसरे प्रकरण शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
या प्रकरणात अपघातानंतर अल्पवयीन चालक असलेल्या मुलाच्या घरच्यांनी सर्व यंत्रणांना हाताशी धरण्याचा प्रयत्न केला होता. महत्त्वाचे म्हणजे,आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने दारूचा अंश रक्तात येऊ नये यासाठी त्याच्या आजोबासह आई-वडिलांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरच मॅनेज केले होते.
त्यासाठी मोठा आर्थिक व्यवहारही झाला होता. मुलाचे आजोबा, आई-वडील यांच्यासह डॉक्टरांनाही या प्रकरणात अटक झाली. याप्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर लवकरच सत्र न्यायालयातील खटल्याची सुनावणी होणार आहे. यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे काम पाहणार आहेत.
Comments are closed.