IMPIMP

Pune Crime News | पुणे : डॉक्टरांचे अपहरण करुन १ लाखांची खंडणी उकळून गोळीबार करुन पळून गेलेला कुख्यात गुन्हेगार जेरबंद; आळेफाटा बस स्थानकात पिस्तुलासह पकडले

पुणे : Pune Crime News | मंचर येथील डॉक्टरांचे अपहरण करुन त्यांच्याकडे २० लाखांची खंडणी मागितली़ एक लाख रुपये खंडणी उकळून त्यांच्यावर गोळीबार करुन पेठ घाटात डॉक्टरांना सोडून पळून गेलेल्या टोळीपैकी कुख्यात सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

प्रविण ऊर्फ डॉलर सिताराम ओव्हाळ (वय ३२, रा. वाळद, ता़ खेड) असे कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा ५१ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.

कैलास रघुनाथ काळे (रा. मंचर, ता. आंबेगाव) हे ४ मार्च रोजी मोटारसायकलने जात असताना एका चारचाकी गाडीने त्यांना धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर त्यांचे अपहरण करुन निघोटवाडी परिसात नेले. तेथे जबर मारहाण करुन २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. १ लाख रुपयांची खंडणी घेऊन आरोपींपैकी एकाने डॉक्टरांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तुलातून गोळी झाडली होती. त्यानंतर डॉक्टरांना पुणे -नाशिक महामार्गावरील पेठ घाटाचे जवळ सोडून ते पळून गेले होते.

हा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याच्या सुचना दिल्या. पोलिसांनी मुख्य आरोपी पवन सुधीर थोरात (रा. मंचर, ता. आंबेगाव) याला अटक केली. त्यातील कुख्यात गुन्हेगार प्रविण ओव्हाळ हा फरार झाला होता. त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म अ‍ॅक्ट यासारखे गुन्हे दाखल असल्याने तो पोलिसांपासून पळून जात होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांना प्रविण ओव्हाळ हा आळेफाटा एस टी स्टँडवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ओव्हाळ याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २ जिवंत काडतुसे व गावठी पिस्तुल मिळाले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार दीपक साबळे, अक्षय नवले, संदिप वारे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर निलेश सुपेकर यांनी केली आहे.