IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील भंगार व्यावसायिकाचे पाटण्यात अपहरण करून खून; व्यवसायात कोट्यवधींचा नफ्याचं आमिष देऊन सायबर गुन्हेगारांनी लुटलं

Pune Crime News | Pune scrap metal businessman kidnapped and murdered in Patna; Cyber ​​criminals robbed him by luring him with crores of profit in business

पुणे: Pune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध भंगार व्यावसायिकाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लक्ष्मण साधू शिंदे (Laxman Sadhu Shinde) असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. बिहार मधील पाटणामध्ये भंगार व्यवहाराच्या आमिषाने त्यांना बोलावण्यात आले होते. याप्रकरणी पाटणा पोलिसांनी तिघांना अटक केली असून १५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी रात्री लक्ष्मण शिंदे पाटणा विमानतळावर पोहोचले होते. त्यावेळी त्यांचे पत्नीशी शेवटचे बोलणे झाले. ज्यामध्ये त्यांनी शिवराज सागी नावाच्या व्यक्तीने पाठवलेली कार त्यांना झारखंडकडे घेऊन चालली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिंदे यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नव्हता. १३ एप्रिल रोजी शिंदे यांचे मेहुणे विशाल लवाजी लोखंडे यांनी पाटणा विमानतळ पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

दरम्यान, १२ एप्रिल रोजी जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी चौकशी केली असता, मृतदेहावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या. कुटुंबीयांनी हा मृतदेह लक्ष्मण शिंदे यांचाच असल्याची ओळख पटवली.

त्यानंतर पोलिसांच्या तपासात अशी माहिती समोर आली की , काही सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्मण शिंदे यांच्याशी संपर्क साधून झारखंडमधील कोल इंडियाच्या मालमत्तेचा मोठा भंगार व्यवहार असल्याचे सांगितले होते. त्यामध्ये कोट्यवधींचा नफा होईल, या आमिषाने शिंदे पाटणाकडे रवाना झाले.

मात्र विमानतळावर पोहोचताच त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना नवादा मार्गे त्यांना जहानाबाद येथे नेवून त्यांचा खून करण्यात आला. हा खून रस्ते अपघात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तपास करताना शिंदे यांच्या खात्यातून व्यवहार झाल्याचे पुरावे मिळवले. त्यामुळे हा सगळा अपघाताचा बनाव असल्याचे उघड झाले.

दरम्यान पाटणा आणि नालंदा या परिसरात सक्रिय असलेल्या सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. लक्ष्मण शिंदे हे पुण्यातील कोथरूडमधील इंद्रायणी कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहत होते. निघण्यापूर्वी त्यांनी पत्नीसोबत व्यवहाराची चर्चा केली होती. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.