IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | टी शर्ट आणि चालण्याच्या लकबीवरुन चार महिन्याच्या प्रयत्ननंतर घरफोडी चोरटा जेरबंद; 18 लाखांचे 26 तोळे सोन्याचे दागिने जप्त, महाळुंगे पोलिसांची कामगिरी (Video)

February 1, 2025

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | खेड तालुक्यातील कुरुळी येथील अरविंद प्रकाश कसाळे हे त्यांच्या कुटुंबियासह कामानिमित्त घराबाहेर गेले असताना चोरट्याने पावणे दोन तासाच्या अवधीत दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील २६ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. पोलिसांनी चोरट्याचा टी शर्ट व त्याची चालण्याची लकब याच्या आधारे चार महिने अथक प्रयत्न करुन चोरट्याला जेरबंद केले. दागिने खरेदी करणार्‍याला बिहारमधील नेपाळ सीमेवरील गावी जाऊन अटक केली. (Mahalunge MIDC Police Station)

टुल्लुकुमार रामुराऊत (वय २५, रा. पवार वस्ती, चिखली, मुळ रा. सराटा, ढाका, बिहार), बालेश्वर प्रसाद नंदलाल साह (वय ४५, रा. बखरी खजुरी, ढाका, जि. मोतीहारी, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Arrest In Theft Case)

अरविंद कसाळे यांच्या घरी २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी साडेअकरा ते पावणे बारा दरम्यान घरफोडी झाली होती. मध्यमवर्गीय कुटुंबियांचे घरातून मोठ्या किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी गुन्ह्यातील चोरट्याचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपास पथक फिर्यादी यांचे घराचे परिसरात वावरणारे संशयित व्यक्तीविषयी माहिती प्राप्त करत होते. त्यादरम्यान फिर्यादी यांचे घराचे परिसरात एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला. त्याची ओळख पटत नसल्याने त्याच्या विषयी माहिती प्राप्त होण्यास अडचणी येत होत्या. तपास पथकामधील अधिकारी व अंमलदार यांनी संशयित व्यक्तीप्रमाणे दिसणारे अनेक व्यक्तीकडे तपास केला. मात्र त्यात यश येत नव्हते.
संशयित व्यक्तीची शरीरयष्टी व त्याचे चालण्याची लकब याचा अभ्यास करुन तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व अंमलदार यांनी संशयित व्यक्तीचा वेगवेगळ्या भागात शोध घेत होते. १४ जानेवारी २०२५ रोजी तपास पथकाचे पोलीस अंमलदार गणेश गायकवाड हे परेड करुन परत कर्तव्यावर येत असताना स्पाईन रोड परिसरात त्यांना संशयित व्यक्तीप्रमाणे एक जण दिसून आला. त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेले दागिने त्याचे मुळ गावी बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातील ढाका या गावी विकल्याचे सांगितले. त्यानुसार बिहार येथील नेपाळ सीमेवरील दुर्गम ठिकाणी घेऊन जाऊन दागिने खरेदी करणार्‍यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरलेले १८ लाख रुपयांचे २६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गोर यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजु कोणकेरी, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, अमोल बोराटे, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर, अमोल माटे, मंगेश कदम, शरद खैरे, राजेश गिरी तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांचे कार्यालयातील सहायक फौजदार राजू जाधव यांनी केली आहे.