Pune Tripal Murder Case | रांजणगाव ट्रिपल मर्डरचा 12 दिवसांनी पर्दाफाश ! अनैतिक संबंधातून विवाहाचा तगादा लावल्याने झाले हत्याकांड, मिसिंग रद्द न केल्याने पोलीस पोहचू शकले आरोपीपर्यंत
पुणे : Pune Tripal Murder Case | चुलत मामाची मुलगी असल्याने पतीपत्नीतील वाद मिटविण्यासाठी तो पुढाकार घेत असे. त्यातून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. पतीबरोबरच्या भांडणाला कंटाळून आळंदी येथे रहायला आलेल्या महिला लग्नाचा आग्रह करु लागली. त्यातूनच त्याने या महिलेला व तिच्या २ व १ वर्षाच्या मुलांना घेऊन खंडाळे गावाकडे जाणार्या कच्च्या रस्त्यालगत आणले. तेथे त्यांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खुन केला. पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. रांजणगाव गणपती येथील खंडाळे गावाजवळील रस्त्यालगत एक महिला व दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह २५ मे रोजी मिळाले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण राज्यभरातील मिसिंगचा शोध घेतल्यानंतर १२ दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Rural Police)
स्वाती केशव सोनवणे (वय २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड) व तिचे मुले स्वराज (वय २) आणि विराज (वय १) अशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गोरख पोपट बोखारे (वय ३६, सध्या रा. सरदवाडी, ता. शिरुर, मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला अटक केली आहे.
रांजणगाव गणपती गावाचे हद्दीत पुणे – अहिल्यानगर महामार्गाचेलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीपासून खंडाळे गावाकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला २५ मे रोजी एक महिला व दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले होते.
हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सुचना केल्या होत्या. मृत महिलेच्या हातावर असलेल्या जयभिम, rajratan, mom, dad, R S असे टॅटू गोंदले होते. त्यावरुन शोध घेण्याचा प्रयत्न केला. परिसरातील २५० सीसीटीव्ही फुटेज वाघोली ते राहुरीपर्यंत तपासण्यात आले. सुमारे १६ हजार ५०० भाडेकरु तपासण्यात आले. चाकण, तळेगाव, सुपा, रांजणगाव एमआयडीसीतील कामगारांकडे तपास करण्यात आला. मृतदेहाचे हातावरील अक्षराच्या आधारे बँकामधील काही खातेदारांची माहिती घेऊन तपास करण्यात आला. आशा वर्कर्स, आरोग्य विभागातील सेविका यांचेकडून लहान मुलांचे अनुषंगाने तपास करुन लसीकरणाची माहिती घेत मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तरीही ओळख पटविण्यात यश येत नव्हते.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील प्रत्येकी एक अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अंमलदार यांची बैठक घेतली. त्यांना सूचना करुन २६ अंमलदारांची ६ पथके तयार केली. त्यांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मिसिंगची माहिती घेऊन पडताळणी करण्यात आली. त्यात बीड जिल्ह्यात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ९ मे रोजी एक महिला मिसिंग असल्याची नोंद आढळून आली. ही महिला व मृत महिलेचे वर्णन सारखे असल्याने त्याबाबत सखोल तपास करण्यात आला.
स्वाती सोनवणे हिचा पती केशव सोनवणे याच्याकडे चौकशी केली. स्वाती सोनवणे ही तिचे दोन मुलांसह आळंदी येथे तिचे आईवडिलांकडे गेली होती. तिचे व नवर्याचे भांडण होत असल्याने स्वाती दोन्ही मुलांना घेऊन तिच्या बहिणीचा दिर गोरख बोखारे याच्या मोटारसायकलवरुन २३ मे रोजी रात्री ९ वाजता आळंदी येथून गेलेली असल्याची माहिती समोर आली. स्वाती हिचे आईवडिल आळंदी येथे मोलमजुरी करतात. त्यामुळे त्यांनी तिच्याबाबत पुन्हा माहिती घेतली नाही. ती कोठे आहे, हे त्यांना माहिती नव्हते.
पोलिसांनी गोरख बोखारे याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबुल केला. स्वाती व तिच्या नवर्यामध्ये नेहमी भांडण होत होती. गोरख बोखारे हा त्यांचा वाद मिटवत असे. त्यादरम्यान गोरख व स्वाती यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले. त्यामुळे स्वाती ही गोरखला लग्न करण्याची मागणी करत होती. २३ मे रोजी गोरख याने त्याच्याकडील मोटारसायकलवरुन स्वाती व तिच्या दोन्ही मुलांना आळंदी येथून घेतले. सरदवाडी येथे जात असताना रात्रीचे वेळी रांजणगाव गणपती येथील महामार्गालगत असलेल्या ग्रोवेल कंपनीपासून खंडाळे गावाकडे जाणार्या कच्च्या रोडलगत मोटारसायकल थांबविली. तिने केलेल्या लग्नाचे मागणीला विरोध करण्यासाठी त्याने स्वाती व तिचे दोन्ही मुलांचा गळा आवळून डोक्यात दगड टाकून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकले.
मिसिंग रद्द न केल्याने लागला शोध
गोरख बोखारे हा सरदवाडी येथे ड्रायव्हर म्हणून काम करतो. नवर्याशी भांडणे झाल्याने स्वाती दोन मुलांना घेऊन निघून गेली होती. म्हणून तिच्या नवर्याने केशव सोनवणे याने मिसिंगची तक्रार दिली होती. परंतु, नंतर ती परत आली होती. पण, त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या दप्तरी ती मिसिंग तशीच होती. ते एकमेकांचे नातेवाईक असल्याने ती गोरखबरोबर आळंदीला गेल्याची केशवला माहिती होती. परंतु, आळंदीवरुन ती गोरखबरोबर निघून गेल्याची माहिती तिच्या आईवडिलांना होती. पण, पुढे त्यांनी माहिती घेतली नव्हती. ती मिसिंग रद्द केली न गेल्याने पोलिस अधिक तपास करत तिची चौकशी करत गेल्याने हे मृतदेह स्वाती व तिच्या मुलांचे असल्याचे व गोरखनेच खुन केल्याचे उघड होण्यास मदत झाली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, एएचटीयु चे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, निळकंठ तिडके, अविनाश थोरात, सविता काळे, महेश डोंगरे, दीपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजू मोमीन, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेशा कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, जयराज देवकर, अमोल नलगे, विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, तसेच बीड जिल्ह्यात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशय बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ यांनी केली आहे.