IMPIMP

Shivaji Nagar Pune Crime News | अट्टल गुन्हेगाराकडून 13 घरफोड्या उघड ! 235 ग्रॅम सोन्याचे दागिने, 212 ग्रॅम चांदीचे दागिन्यांसह 49 चाव्यांचा जुडगा हस्तगत (Video)

February 13, 2025

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात ५० हून अधिक घरफोड्या नावावर असलेल्या अट्टल गुन्हेगाराला पकडून शिवाजीनगर पोलिसांनी १३ घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. (Shivaji Nagar Police)

हर्षद गुलाब पवार (वय ३१, रा. गुलाबनगर, घोटावडेफाटा, ता. मुळशी) असे या चोरट्याचे नाव आहे. त्यांच्याकडून २३६ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१२ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच ४९ वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्यांचा जुडगा आणि घरफोडीची हत्यारे जप्त केली आहेत. (Arrest In Theft Case)

याबाबत पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (IPS officer Sandeep Sigh Gill) यांनी माहिती दिली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे तपास पथकासह पेट्रोलिंग करत असताना ४ फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, शिवाजीनगर बसस्टॉपवर एक संशयित थांबला असून त्याने ठिकठिकाणी चोर्‍या केलेल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (Sr PI Chandrashekhar Sawant) यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सॅकमध्ये सोने चांदीचे दागिने तसेच घरफोडीचे साहित्य मिळून आले. अधिक चौकशीत त्याने ठिकठिकाणी रेकी करुन १३ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले. त्यात शिवाजीनगर पोलीस ठाणे व वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी ३, खडक आणि विमानतळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी २, चंदननगर, बावधन, आळंदी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक यांचा समावेश आहे.

सीसीटीव्हीत दिसून नये म्हणून घेत होता काळजी

हर्षद पवार याच्यावर २०२३ पूर्वी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ५१ हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यात त्याला २०२३ मध्ये जामीन मिळाल्यावर तो कारागृहाबाहेर सुटला होता. त्यानंतर त्याने घरफोडी करण्यापूर्वी तो परिसराची रेकी करुन कोठे कोठे सीसीटीव्ही आहे, याची पहाणी करायचा. घरफोडी करण्यासाठी जाताना तो या सीसीटीव्हीमध्ये दिसणार नाही, अशा पद्धतीने ४० ते ५० किमीचा प्रवास करुन त्या ठिकाणी जात असे. जाताना स्वत:ची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असे. सीसीटीव्ही दिसलाच तर तो पटकर मोबाईलवर बोलत जात असल्याचा बहाणा करुन तेथून बाजूला निघून जात असे. चोरलेले सोने -चांदीचे दागिने विकण्यासाठी सह आरोपी निळकंट राऊत याची मदत घेत असे.

४९ चाव्यांचा जुडगा

घरफोडी करण्यासाठी त्याच्याजवळून कटावणी, स्क्रु ड्रायव्हरबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कुलुपांच्या एकूण ४९ चाव्या मिळून आल्या. कुलूप उघडण्यासाठी तो या चाव्यांचा जुडगा बरोबर बाळगत. चाव्याचा वापर करुन तो कुलूप उघडत असे. कुलूप उघडले नाही तर तो कटावणीने कडी कोयंडा उचकटत असत.

याबरोबरच शिवाजीनगर परिसरातील घरफोडीच्या एका गुन्ह्यात पोलीस अंमलदार तेजस चोपडे व आदेश चलवादी यांच्या बातमीवरुन शुभम गिरी याला शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे पकडण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत.

याबाबत पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांनी सांगितले की, या अट्टल गुन्हेगाराविषयी ग्रामीण पोलीस दलाकडून स्थानिक माहिती घेण्यात येत आहे. हर्षद पवार हा शनिवार, रविवार सोडून दिवसा घरफोडी करायचा. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार रुपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर वलटे, पोलीस अंमलदार सचिन जाधव, प्रविण दडस, सुदाम तायडे, कृष्णा सांगवे, तेजय चोपडे, आदेश चलवादी यांनी केली आहे.