IMPIMP

Anil Deshmukh On Devendra Fadnavis | माजी गृहमंत्र्यांच्या दाव्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता

July 8, 2024

जळगाव: Anil Deshmukh On Devendra Fadnavis | राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) नेते अनिल देशमुख यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे तथ्यहीन होते. केवळ हवेतले ते आरोप होते. कोणतेही पुरावे नसताना आपल्याला खोट्या आरोपाखाली १४ महिने जेलमध्ये ठेवण्यात आले असे ते म्हणाले. जो शंभर कोटींचा आरोप करण्यात आला त्यामागे देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी परमवीर सिंग (Param Bir Singh) यांना हा आरोप करायला सांगितला होता असा दावा देशमुख यांनी केला आहे.

त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. तर तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना क्लिनचिट देण्यात आली होती.

शंभर कोटींचा आरोप केल्यानंतर फडणवीसांनी काही माणसं आपल्याकडं पाठवली होती असे अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यांच्याकडे एक पाकीट होते. त्यात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहीलेला मजकूर हा धक्कादायक होता. शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वर तुम्ही शंभर कोटी वसूलीचा आरोप लावा. तसं तुम्ही केल्यास ईडी (ED), सीबीआय (CBI) तुमच्या मागे काही लागणार नाही असा दावा देशमुख यांनी केला आहे. शिवाय फडणवीसांनी पाठवलेले पत्रातले मुद्दे आणि पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचा दावाही देशमुख यांनी केला आहे. या दाव्यामुळे भविष्यात फडणवीसांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Govt) अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. त्याचवेळी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंबईतील पब, बार,आणि हॉटेलमधून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते असा आरोप सिंग यांनी केला. त्यानंतर हे पत्र व्हायरल झाले होते. दरम्यान अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता.