Ganeshotsav In Kashmir | भव्य विसर्जन मिरवणुकीने काश्मीरमधील सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता; पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप (Video)
युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या पुढाकाराने काश्मीर खोऱ्यात सुरू झालाय गणेशोत्सव
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Ganeshotsav In Kashmir | काश्मीर खोऱ्यात पाच दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची भव्य विसर्जन मिरवणुकीने बुधवारी सांगता झाली. यावेळी बाप्पाला जड अंतःकरणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला.
विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर इतरही अनेक उपक्रम या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये काश्मीरमधील स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात ३४ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता, ही बाब लक्षात घेऊन काश्मीरमध्ये पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील मानाच्या सात गणपती मंडळांनी एकत्र येत त्यासाठी पाऊल टाकले आणि गतवर्षी काश्मीरमधील लाल चौकात दीड दिवसांचा गणपती उत्सव साजरा झाला. यावर्षी कुपवाडा व अनंतनाग या आणखी दोन ठिकाणी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा झाला. बुधवारी या दोन्ही ठिकाणच्या गणरायाचे भव्य अशा मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले.
त्यामधील पहिली मिरवणुक गणपतीयार मंदिर ते हबा कडल येथील झेलम नदीपर्यंत आणि दुसरी मिरवणुक वेसू केपी कॉलनी ते संगम अनंतनाग पर्यंत असा तब्बल ११ कि.मी. अंतरापर्यंत निघाली. या दोन्ही मिरवणुकीत स्थानिक संगीत वाद्य वाजविण्यात आली. त्यात स्थानिक काश्मीरी नागरिक मोठ्या भक्ती भावाने सहभागी झाले होते.
बाप्पाला गोड पोळीचा नैवद्य
काश्मीरमधील गणेशोत्सवामधील महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे बाप्पाची होणारी पन्ना पूजा. ज्यामध्ये श्रीगणेशाला गोड पोळीचा नैवद्य अर्पण केला जातो. ही पुजा म्हणजे एकता आणि सामुदायिक सौहार्दाचे प्रतीक मानले जाते.
“काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. पुण्यातील सातही प्रमुख गणेश मंडळांनी त्यासाठी पुढाकार घेतला. आगामी काळात हा उत्सव आणखी भव्य स्वरूपात साजरा व्हावा यासाठी आमचे प्रयत्न राहतील. काश्मीर खोऱ्यातील सर्व गणेश मंडळाचा आणि नागरिकांचे आम्ही आभारी आहोत.”
- पुनीत बालन (उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती)
Comments are closed.