Kolhapur Crime News | मित्राने केलेली चेष्टा बेतली जीवावर, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

कोल्हापूर : Kolhapur Crime News | मित्राने केलेली चेष्टा जीवावर बेतल्याची घटना समोर आली. गारगोटी येथील अभियांत्रिकी शिक्षणानिमित्त शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. विहिरीशेजारी तो कपडे धूत असताना मित्राने चेष्टा मस्करी करीत त्याला विहिरीत ढकलले असता त्याचा मृत्यू झाला आहे. तानाजी भागोजी बाजारी (वय-१८, रा. फये धनगरवाडा) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात करण्यात आली आहे. याप्रकरणी तानाजीचे चुलते सोनबा बिरू बाजारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रोहित सुतार (रा. गारगोटी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग (आयसीआरई) मध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षात शिकत होता. शासकीय वसतिगृहात राहणारा तानाजी बाजारी हा विद्यार्थी डी. के. देसाई यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर कपडे धुत होता. यावेळी तानाजी याला रोहित सुतार याने चेष्टामस्करी करीत पाण्यात ढकलले. तानाजीला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतरच नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तानाजी बाजारी हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. बिकट आर्थिक स्थितीमुळे तो बालपणापासून वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. श्री मौनी विद्यापीठाच्या अमरनाथ कांबळे वसतिगृहात तो दहावीपर्यंत राहिला. श्री शाहू कुमार भवन प्रशालेतून त्याने दहावीला ९२ टक्के गुण मिळवले होते. गेल्याच महिन्यात झालेल्या पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या सेमिस्टरला त्याने ९० टक्के गुण मिळवले होते. त्याच्या पश्चात आई- वडील आणि चार बहिणी असा परिवार आहे.
Comments are closed.