Kolhapur Crime News | बारावी परीक्षेत कमी गुण पडण्याची भीती, विद्यार्थिनीने नैराश्येत उचलले टोकाचे पाऊल, फॅनला साडीने गळफास घेत आत्महत्या

कोल्हापूर : Kolhapur Crime News | बारावी परीक्षेत कमी गुण पडण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने साडीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. संचिता लक्ष्मण कडव (वय-१७, रा. जुना वाशी नाका) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. बेशुद्धावस्थेत तिला सीपीआरमध्ये आणण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, संचिताचे वडील हार, बुके बनविण्याचा व्यवसाय करतात. मूळचे गारगोटीचे कडव कुटुंबीय गेली ८ ते १० वर्षे वाशीनाका परिसरात वास्तव्यास होते. संचिताने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. गेले काही दिवस ती नैराश्येत होती. बारावीमध्ये आपल्याला कमी गुण पडतील, अशी तिने भीती व्यक्त केल्याने कुटुंबीयांनीही वारंवार तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.
मंगळवारी सायंकाळी ती छोट्या बहिणीसोबत खोलीत बसली होती. तिने छोट्या बहिणीला बाहेर घालवून खोलीला आतून कडी लावून घेतली. बराच वेळ हाक देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडून कुटुंबीयांनी आत प्रवेश केला. यावेळी संचिताने बेडरूममधील फॅनला साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. फास सोडवून तिला बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या पश्चात आई-वडील, बहीण, चुलते असा परिवार आहे.
Comments are closed.