Leopard Ambegaon Pune | घरात टीव्ही पाहात असताना अचानक आजीसमोर बिबट्या उभा राहिला; पुढं झालं असं काही
आंबेगाव: Leopard Ambegaon Pune | आंबेगाव तालुक्यातील कळंब व लौकी हद्दीवर असलेल्या सूंभेमळ्यात लक्ष्मीबाई खंडू थोरात (वय ७०) या घरात टीव्ही पाहात होत्या. त्यावेळी घरात अचानकपणे बिबट्याने प्रवेश केला. घडलेल्या घटनेमुळे घाबरून न जाता आजीने मोठ्या धैर्याने प्रतिकार केल्यामुळे स्वतःला वाचवण्यात त्यांना यश आले. बिबटे अगदी घरात येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लक्ष्मीबाई थोरात या गेल्या वर्षभरापासून सूंभेमळा येथे एकट्या राहतात.
घराचा दरवाजा उघडा ठेऊन त्या नेहमीप्रमाणे रात्री घरात टीव्ही पाहात होत्या. त्यावेळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश केला. कशाचातरी आवाज आल्याने आजी पुढे जाऊन पाहतात तर दोन फुटांच्या अंतरावर बिबट्या होता. अनाहूतपणे घडलेल्या या घटनेमुळे पूर्णपणे गोंधळून न जाता क्षणाचाही विलंब न करता धैर्याने प्रतिकार करून त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला.
त्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला होता. लक्ष्मण मारुती थोरात, अथर्व बळी थोरात, मोहन बबन थोरात, भरत लक्ष्मण थोरात आदी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात बिबट्याला दत्तात्रय राजाराम थोरात यांच्या उसाच्या शेतात जाताना पाहिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लौकी , कळंब, चांडोली बुद्रुक आदी गावात बिबट्यांनी शेळ्या, मेंढ्या, बैल व वासरांचा फडशा पाडला आहे. कळंब येथील सूंभेमळ्यात अगदी घरात येऊन बिबटे हल्ले करू लागले आहेत. अनेकांना दिवसा बिबटे नजरेस पडले आहेत. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Comments are closed.