IMPIMP

Pankaja Munde On Sharad Pawar | आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडेंकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य; म्हणाल्या…

पुणे : Pankaja Munde On Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्याचा महायुतीला मोठा फटका बसला. आगामी विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2024) सामोरे जाताना आरक्षणाच्या मुद्द्यावरुन फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही सवाल विचारा, तुमची भूमिका काय, असा प्रश्न विचारण्याचे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, हा सूर्य हा जयद्रथ असल्याचेही पंकजा यांनी म्हटले. मुंडेंनी पुण्यातील मेळाव्यातून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

लोकसभेला आपलं जे नुकसान झालंय ते भरुन काढायचं आहे. म्हणूनच, आपल्या सारख्या छोट्या छोट्या योद्ध्यांना पक्षाने मैदानात उतरवलं आहे. आता, पक्षासाठी आपण सर्वांनी जोमाने काम करायला हवं, सेनापती सांगत असतो पण सैनिकाला प्रत्यक्ष लढावं लागतं, तुम्ही सैनिक आहात, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना आपापसातील मतभेद विसरुन पक्षासाठी काम करा, असे आवाहन येथील मेळाव्यातून केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आता आरक्षणाच्या बाबतीतील फेक नॅरेटिव्ह चालणार नाही, आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे. तुम्ही आमच्या पक्षावर बोलताय, मग तुमची भूमिका काय? राष्ट्रवादीला विचारा, तुमचं म्हणणं आहे का ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे.

सगळंच तुम्ही आमच्यावर घालताय, आमच्याच अंगावर ओबीसी समाज घालताय, मराठा समाज आमच्या अंगावर घालताय, आमच्याच अंगावर दलित बांधवांना घालताय, जणू काही आपण दुसऱ्या देशातून आलोय आणि येथील राजकारण उध्वस्त करतोय, अशा शब्दात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पुण्यातील वडगाव शेरी येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केले.