IMPIMP

Pune Crime News | उंचावर लटकून धोकादायक रिल्स बनवणाऱ्या पुण्यातील ‘त्या’ तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल

June 21, 2024

पुणे: Pune Crime News | रिल्स बनवण्याच्या (Reels) नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालत असतात. अलीकडे रिल्सच्या नावाखाली जीवघेणा स्टंट केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. मागील काही दिवसात पुण्यात एक तरुणी हात सोडून दुचाकी चालतावतानाचा व्हिडिओ समोर आला होता. या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

त्यानंतर आता तरुण-तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुणी तरुणाचा हात पकडून लटकताना दिसत आहे. त्यांचा व्हिडिओ शूट करण्यासाठी अन्य दोघे जण तेथे उपस्थित आहेत. हा व्हिडिओ नवीन कात्रज हायवेवरील (News Katraj Highway) स्वामी नारायण मंदिर (Swami Narayan Temple Pune) परिसरात पडक्या उंच इमारतीवरून केलेला आहे. दरम्यान व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आता या व्हिडिओवरून लोकं या कृत्याबाबत टीका करताना दिसत आहेत.

भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) व्हिडिओची खात्री करून संबंधित तरुण व तरुणीवर गुन्हा दाखल केलेला आहे. स्वतःचा जीव व इतरांचा जीव आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केल्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३३६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या रिल्स मधील तरुण तरुणीचा शोध सुरु आहे. त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अशाप्रकारेचे कोणतेही धोकायदाक कृत्य करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.