IMPIMP

Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य (Video)

पुणे : Sassoon Hospital | पुण्यातील शासकीय रुग्णालय ससून मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणचे डॉक्टरच रुग्णांना निर्जन स्थळी सोडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संबंधितांवर येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संताप व्यक्त केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड (Dadasaheb Gaikwad) आणि रितेश गायकवाड (Ritesh Gaikwad) यांनी हा प्रकार समोर आणला आहे. ससून रुग्णालयात दादासाहेब यांनी रुग्णाला दाखल केले होते. मात्र तो रुग्ण बेपत्ता झाला होता. त्यांना याची शंका आल्यावर त्यांनी सापळा रचला आणि आणखी एक रुग्ण ससूनमध्ये दाखल केला. त्यानंतर पहाटेच्या वेळी आदी नावाचे डॉक्टरने त्या रुग्णाला रिक्षातून निर्जन स्थळी सोडले आणि डॉक्टर कर्मचाऱ्यांसह कारमधून निघून गेले.

या प्रकारावर रितेश गायकवाड म्हणाले, “काल मी ससूनबाहेर उभा असताना आदी नावाचा एक डॉक्टर तिथे आला एका रुग्णाला सोडायचे आहे म्हणाला. पुढे त्याने सांगितले की, बेवारस रुग्णांना सांभाळायला, त्यांच्यावरील उपचाराची कार्यवाही करायला त्रास होतो. म्हणून आम्ही बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडत असतो. यासाठी आम्ही एक रिक्षावाला ठरवला असून, यासाठी त्याला आम्ही 500 ते 600 रुपये देतो,” असे रितेश गायकवाड यांनी सांगितले.

रुग्ण आधार फाउंडेशनच्या (Rugn Aadhar Foundation) माध्यमातून फुटपाथवर जगणाऱ्या तसेच बेवारस रुग्णांना आश्रमात आश्रय देण्याचे काम करीत असल्याचे तक्रारदार रितेश गायकवाड यांनी सांगितले.