IMPIMP

Uddhav Thackeray Group On PM Modi | भाजप व दोन बनावट कंपन्यांचा प्रत्येक मतदारसंघात 100 कोटींचा खेळ, अजित पवारांच्या बारामतीच्या घरातील…, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा

by sachinsitapure

नवी दिल्ली : Uddhav Thackeray Group On PM Modi | पाचव्या टप्प्यासाठी देशभरात ४९ जागांवर मतदान (Loksabha Election 2024) पार पडले. या दिवशी सामान्य जनता हा मतदार राजा असतो. या राजालाही विकत घेण्याचे प्रयोग शेवटपर्यंत सुरू होते. भारतीय जनता पक्ष व त्यांच्या इतर दोन बनावट कंपन्यांनी एकेका मतदारसंघात शंभर शंभर कोटींचा खेळ केला असे म्हणतात, असा दावा शिवसेना ठाकरे गटाने आपले मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात केला आहे. होय, मोदी जात आहेत, असा मथळा या अग्रलेखाला देण्यात आला आहे.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, त्याआधी बारामतीत हाच खेळ झाला. लोकांना भ्रष्ट बनवून निवडणुका जिंकण्याचा हा प्रकार देशाला धोकादायक आहे. असे सांगितले गेले की, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामतीमधील घरातील नोकर वर्गासही रोख पैसे देऊन मतदानास पाठवले. ही परिस्थिती असेल तर लोकशाही, स्वातंत्र्याची जपमाळ का ओढत बसायचे?

मोदी काळ हा लोकशाहीसाठी सगळ्यात अशुभ काळ ठरला. लोकशाही, निवडणुका, विजय पैशांच्या बळावर विकत घेऊ शकतो हे मोदी व त्यांच्या लोकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. विचारस्वातंत्र्य, अधिकारस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य आणि संघटना स्वातंत्र्य ही लोकांची मूलभूत स्वातंत्र्य संसदेतील बहुमताला हिरावून घेता येत नाहीत. ही स्वातंत्र्य असणे हीच लोकशाहीची खूण आहे.

मोदी यांना पुन्हा सत्ता हवी, ती राज्यघटनेत पूर्ण बदल करण्यासाठी. कदाचित ते हेमंत बिस्वा सर्मा, अजित पवार (Ajit Pwar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सदस्य असलेली एखादी नवी राज्यघटना समिती निर्माण करतील व भाजपच्याच एखाद्या वकिलास घटना समितीचे अध्यक्ष बनवून नवी घटना लिहून घेतील; पण राज्यघटना बदलण्याचा संसदेचा अधिकार अमर्याद नाही, असे ३६८ व्या कलमात म्हटले आहे.

राज्यघटनेने संसदेची निर्मिती केली आहे. म्हणून राज्यघटनेचा अधिकार संसदेच्या वरचा आहे आणि होय, लोकांचा अधिकार राज्यघटनेच्या वरचा आहे. म्हणून राज्यघटना सहज बदलता येणार नाही व लोक त्यास मान्यता देणार नाहीत. देशाची जनता असल्या गुलामगिरीला कधीही संमती देणार नाही.

गेल्या दहा वर्षांत लोकशाही व राज्यघटनेचे अधःपतन झाले. पंतप्रधान हे हुकूमशहाच बनले. जनता सार्वभौम असते तेथे पंतप्रधान सार्वभौम बनले. सत्तेचे केंद्रीकरण, अधिकारांचे केंद्रीकरण, एका आणि एकाच व्यक्तीचा उदो उदो, मतस्वातंत्र्यावर निर्बंध, राजकीय विरोधक आणि न्यायालयांची मुस्कटदाबी, नागरिकांत दहशत ही सारी कशाची लक्षणे आहेत? हुकूमशहाचे हेच तर खाद्य असते.

लोकशाहीतील नेता एवढे सर्वंकष अधिकार मागत नाही. विचारांवर बंधने आणि सत्तेचे केंद्रीकरण यावरच हुकूमशाही पोसली जाते. मोदी व त्यांच्या पक्षाला साधारण ४३ टक्के मते पडतात. यात गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांचा वाटा मोठा आहे. अनेक राज्ये अशी आहेत की ते मोदी यांच्या अस्तित्वाची दखल घ्यायला तयार नाहीत. अशा वेळी ४३ टक्के मतदार म्हणजे सारा देश असे मानणे कितपत संयुक्तिक ठरेल?

मोदी यांचा उदय झाल्यापासून लाचारी आणि लालसा यांचे थैमान देशात सुरू झाले. हिंदू-मुसलमान झगडे लावून निवडणुकांची दिशाच वळवायची. जागोजाग रामध्वज फडकवून लोकांना अंधभक्त करायचे. यास विरोध करणाऱ्यांना तुरुंगात पाठवायचे. हा दडपशाहीचा कार्यक्रम दहा वर्षे राबविला जातोय.

मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, अशी बातमी पंतप्रधान कार्यालयाने ऐन निवडणुकीत पसरवून काय मिळवले? ज्याचे डोके ठिकाणावर आहे असा कोणताही माणूस भारताची लोकसंख्या भरमसाट वाढावी याचे समर्थन करणार नाही.

लोकसंख्यावाढीचा प्रश्न अत्यंत गंभीर असून आपण तो निर्धारपूर्वक सोडविलाच पाहिजे. मग मोदी यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या काळात लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी काय केले? फक्त हिंदू-मुसलमान करून हा प्रश्न सुटणार नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही विद्वान मंडळींनी, हिंदूंनी कुटुंबनियोजन करू नये व भरमसाट मुलांना जन्म देऊन मुसलमानांच्या लोकसंख्येवर आव्हान उभे करण्याची भाषा करावी, हे कसले हिंदुत्व? उलट हा हिंदुत्वाचा अपमान आहे. देशातील परिस्थिती बिघडलेली असताना, आर्थिक अराजक माजले असताना मोदी व त्यांचा पक्ष लोकशाहीचा गळा घोटून राज्य करीत राहिले.

मोदी यांनी हुकूमशाही, धर्मांधता, भ्रष्टाचार, लांड्या-लबाड्या, पक्षांतरासारख्या विकृत गोष्टींचे खुले समर्थन केले. त्यामुळे पंतप्रधानांच्या बाबतीत त्यांची नेहरू, गांधी, मनमोहन सिंग, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी कधीच तुलना होणार नाही. मोदी यांनी लोकांना भीतीच्या सावटाखाली ठेवले. लोक मूर्ख आहेत व मूर्खच राहतील हे गृहीत धरून सत्ता भोगली.

जनता मूर्ख नाही हे दाखवणाऱ्या या वेळच्या निवडणुकीने देशातील हुकूमशाहीविरुद्ध निर्भयपणे मतदान केल्याचे चित्र दिसले. हुकूमशहा मोदी जात आहेत. महाराष्ट्राने त्याकामी पुढाकार घेतला. मर्द मऱ्हाठी जनतेचे अभिनंदन, असे अग्रलेखात म्हटले आहे. अग्रलेखाच्या शेवटी होय, हुकूमशहा मोदी जात आहे, असे भाकित केले आहे.

Sanjay Raut On Raj Thackeray | राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत घेतली असती तर…, संजय राऊतांचा मनसेवर हल्लाबोल

Related Posts