IMPIMP

Budget Session 2021 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा सरला, विरोधक जोमात तर सरकार बॅकफूटवर ! जाणून घ्या काय काय घडलं

by amol
devendra fadnavis

सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) कोरोना (COVID-19) रुग्ण महाराष्ट्रात आढळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळावं लागलं. सध्या सुरू असणारं अधिवेशन हे पहिलं 8 दिवस चालणारं अधिवेशन आहे. ज्यात पहिल्या 5 दिवसांतच विरोधकांनी सरकारची कोंडी केल्याचं चित्र दिसलं. कोरोना असूनही हे अधिवेशन सुरू आहे.

कसा होता अधिवेशनाचा पहिला आठवडा ? काय काय घडलं ?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या Budget Session पहिल्याच दिवशी विरोधक वीज प्रश्नावरून आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यांनी विधान भवनाच्या बाहेर आणि आत आंदोलन केलं. जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू झालं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी हा प्रश्न मांडला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रश्नावर चर्चा होत नाही तोवर वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. इथं विरोधकांना बळ मिळालं. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सुधीर मुनगंटीवार यांनी धुवांधार बॅटिंग केली. राज्यपालांना विमानातून उतरवणं ते कोरोना काळातील भ्रष्टाचार, संजय राठोड, मुंबईतील मेट्रोसारखे प्रकल्प, आरे कार शेड, कोरोना असून मुंबईत सुरू राहणारे पब, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अशा विविध विषयांवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्व, दिल्लीतील शेतकरी आंदोलन, पेट्रोल-डिझेल दरवाढ या मुद्द्यांवरून टीका केली. आपल्या भाषणात राजकीय मुद्द्यांना त्यांनी सडेतोड उत्तरं दिली, परंतु प्रशासकीय बाबींवर मात्र अपेक्षित उत्तरं आली नाहीत.

सरकारमधील तीनही पक्षांच्या समन्वयाचा अभाव

सभागृहात महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांच्या समन्वयाचा अभाव दिसून आला. पुरवणी मागण्या असो किंवा राज्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर विरोधी पक्षातील नेते आमदार भाषण करताना, सरकारवर टीका करताना, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकटेच त्यांना उत्तरं देताना दिसले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही मंत्री कमी पडले असं चित्र होतं. काही वेळा ज्या विभागावर चर्चा सुरू आहे, त्याचे मंत्री उपस्थित नसल्याची टीकाही विरोधकांनी केली. मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत ही बाब वारंवार विरोधकांनी लक्षात आणून दिली.

सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरण तापणार

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणावरून सरकारची सर्वांत मोठी कोंडी होताना दिसली. देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं. त्या गाडीचा मालक, पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे संबंध, त्यांचे फोन रेकॉर्ड याची माहितीच देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहासमोर मांडली. त्या गाडीच्या मालकाला सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली. आणि यानंतर काही मिनिटांतच त्या गाडीच्या मालकाचा मृतदेह खाडीत सापडल्याचं आढळून आलं हे वृत्त समोर आलं. यानंतर पूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला.

गृह खातं विरोधकांच्या निशाण्यावर

गृह खात्यावर अधिवेशन काळात विशेष जबाबदारी असते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर लक्ष ठेवावं लागतं. कोणत्याही घटनेनं गालबोट लागू नये, कामकाजात सरकारवर दबाव येऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागते. जळगाव वसतिगृहातील प्रकरण समोर आलं, परंतु त्यातील सत्य वेगळं असल्यानं सरकारला दिलासा मिळाला. मात्र, अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडला याची माहिती गृह खात्याला नव्हती. विरोधी पक्ष माहिती देतं, परंतु गृह खातं अंधारात हे चित्र दिसलं. यावर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि अनिल परब (Anil Parab) यांनी उत्तर देत सावरून नेण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तरीही सरकार बॅकफूटवर असल्याचं स्पष्ट झालं.

8 मार्च रोजी अजित पवार अर्थसंकल्प मांडणार

आर्थिक पाहणी अहवालात दिसलं की, राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका बसला. अजित पवार 8 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडणार Budget Session आहेत. आता उरलेल्या 3 दिवसात अर्थसंकल्प मंजूर करून घेणं, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हे सरकारपुढील मोठं आव्हान आहे. या 3 दिवसात सरकार विरोधकांना निष्प्रभ करणार की, विरोधक सरकारवर कुरघोडी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Posts