IMPIMP

Attack On Car Of Jitendra Awhad | संभाजीराजेंवर केलेल्या टिकेवरून जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला; आव्हाड म्हणाले – ‘आतापर्यंत तुम्हाला आदरार्थी बोलत होतो, पण…’

August 2, 2024

मुंबई: Attack On Car Of Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांवर स्वराज्य संघटनेच्या (Swaraj Sanghatana) पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. आज ठाणे (Thane) येथील घरी परतत असताना पोलीसांच्या समोरच तीन कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर (Vishalgad Violence) जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्यावर टीका केली होती. संभाजीराजेंच्या शरीरात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त वाहत आहे का? हे तपासावे लागेल, असे विधान आव्हाड यांनी केले होते. या विधानाचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेकडून आज आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.

माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, ” तीन जणांनी आज माझ्या गाडीवर हल्ला केला. माझ्याकडे चार पोलीस होते, पण मी त्या तरुणांवर कोणताही हल्ला करण्यास सांगितले नाही. मी या भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. मी विशाळगड बाबत बोललो कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा जो वारसा दिला आहे, तो त्यांनी पुढे न्यायला पाहीजे होता.

पण त्यांनी केवळ बोलघेवडेपणा केला. माझ्या गाडीवर हल्ला करून मी शांत बसेन असे तुम्हाला वाटत असेल पण तसे होणार नाही मी आणखी त्वेषाने तुमच्याविरोधात बोलणार आहे. आतापर्यंत तुम्हाला आदरार्थी बोलत होतो, पण आता मी बोलण्यासाठी मोकळा आहे “, असे आव्हाड यांनी सांगितले.

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने विशाळगडावर काही समाजकंटकांनी तोडफोड केली.

यानंतर संभाजी राजेंवर टीका करत असताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणणे सोडून द्या. कारण त्यांना वंशपरंपरागत जो अधिकार मिळालेला होता, तो पुढे घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी होती. शाहू महाराज आणि संभाजी राजे यांच्या रक्तात काय आहे? हे तपासण्याची गरज आहे.

शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असे विधान करतो की, ज्यामुळे दंगल उसळते, तो शाहू महाराजांच्या घरातील असूच शकत नाही. त्यामुळे त्यांना छत्रपती कुणी म्हणावे, याचा विचार झाला पाहीजे. ज्यांच्याकडे कर्तुत्व आहे, त्यांना छत्रपती म्हणावे.

आताचे शाहू महाराज यांना मी नक्कीच छत्रपती म्हणेण. कारण त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांची माफी मागितली. जे राजे घराण्यातील लोकांनी करायला पाहीजे, ते शाहू महाराजांनी केले होते, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.