IMPIMP

BJP-Shivsena Eknath Shinde | भाजपा नेतृत्वाकडून शिंदेंना झुकते माप; आगामी मुख्यमंत्री पदाचा चेहरा शिंदेच राहणार? फडणवीसांची केंद्रातून कोंडी केली जात असल्याची चर्चा

July 10, 2024

मुंबई: BJP-Shivsena Eknath Shinde | लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देणार असल्याचे म्हंटले होते. मात्र वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय त्यांनी मागे घेतल्याची माहिती आहे. राज्यात मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न ऐरणीवर आहे. दोन्ही समाज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election 2024) मराठा चेहरा म्हणून महायुतीची (Mahayuti) धुरा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेच सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे फडणवीसांची केंद्रातून कोंडी केली जात असल्याचीही चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा दिल्याने फडणवीस आणि स्थानिक नेतृत्वाने विरोध केला होता. ठाण्यात भाजपाने लढावे अशी फडणवीसांची इच्छा होती मात्र केंद्रीय नेतृत्वाकडून शिंदेच्या मागण्या मान्य झाल्या. लोकसभा निवडणुकीत पराभवाचे खापर फडणवीसांच्या काही निर्णयावर फोडण्यात आले. एकूणच आगामी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा फडणवीस नसून एकनाथ शिंदे असतील अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्यावर भाजपने निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे.

या दोघांनी नुकतीच मुंबईत प्रदेश भाजपच्या कोअर गटाची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात भाजप नेत्यांची मते जाणून घेण्यात आली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीसंदर्भातही चर्चा झाल्याचे समजते. राज्यातील मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातून आलेल्या शिंदेंनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवल्यास काय होईल, यावरही मते जाणून घेण्यात आली.

या चर्चेचा सूर पाहता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्या तुलनेत शिंदेंना झुकते माप दिल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळवून महायुती पुन्हा सत्तेत आली तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचीच वर्णी लागू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने १५ जागा लढवून ७ जागा जिंकल्या होत्या. त्यांचे जागा जिंकण्याचे प्रमाण (स्ट्राइक रेट) ४६.३० टक्के राहिले. तर, भाजपने २८ जागा लढवून फक्त ९ जागा जिंकल्या. भाजपचा स्ट्राइक रेट ३३.३३ टक्के राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाने ४ जागांपैकी १ जागा जिंकली. या पक्षाचा स्ट्राइक रेट २५ टक्के राहिला.

शिंदे गटानेच सर्वाधिक चांगली कामगिरी केल्यामुळे महायुतीमध्ये शिंदेंचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदेगट अधिक आग्रही राहण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने भाजपकडे २८८ पैकी १०० जागांची मागणी केली असल्याचे समजते. मात्र, इतक्या जास्त जागा देण्यास भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने विरोध केल्याची आहे.