IMPIMP

Dhananjay Munde – Anjali Damania | दमानियांनी कथित कृषी घोटाळ्याचा आरोप करताच धनंजय मुंडे तातडीने अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

February 4, 2025

मुंबई : Dhananjay Munde – Anjali Damania | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आज पत्रकार परिषद घेत आणखी काही घोटाळ्यांचे गंभीर आरोप केले. मुंडे हे मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असताना त्यांनी 88 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचे पुरावे दमानिया यांनी पत्रकार परिषदेत मांडले. यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे हे तातडीने पक्षप्रमुख अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

अंजली दमानिया यांनी आज जे कृषी घोटाळ्याचे आरोप केले, त्यानंतर धनंजय मुंडेच नव्हे, तर महायुती सरकारची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता अंजली दमानिया यांनी ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर ती संपत असतानाच धनंजय मुंडे हे तातडीने अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले. आता अजित पवार कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा मंत्रालयात बैठक आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मागील वेळेला परळी थर्मल पॉवरमधील राखेतून धनंजय मुंडे, वाल्किम कराड आणि राजश्री मुंडे यांच्या कंपनीने कोट्यवधी रूपये कमावल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. मात्र, संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग किंवा त्यांच्यावर कोणताही थेट आरोप नसल्याचे म्हणत अजित पवार यांनी मुंडेंना अभय देत मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास नकार दिला होता.

आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी, धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना केलेल्या 88कोटी रूपयांच्या कथित कृषी घोटाळ्याचे पुरावे देत गंभीर आरोप केल्याने, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दमानिया यांनी सातत्याने केलेल्या आरोपांमुळे महायुती सरकारची प्रतिमा देखील मलिन होत असल्याचे बोलले जात आहे.