IMPIMP

Dhananjay Munde On Anjali Damania | अंजली ‘बदनामिया’ म्हणत धनंजय मुंडेंनी उडवली खिल्ली, म्हणाले ”कृषी घोटाळ्याचा आरोप धादांत खोटा, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या मान्यतेने खरेदी”

February 4, 2025

मुंबई : Dhananjay Munde On Anjali Damania | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या कृषी घोटाळ्याच्या गंभीर आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अचानकपणे समोर येत दमानिया यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दमानिया यांचे आरोप धादांत खोटे आहेत. आम्ही शांत बसलो आहोत, असे कोणीही समजू नये. आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही, असा समज कोणीही करुन घेऊ नये, असा इशारा देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.

यावेळी अंजली दमानिया बदनामी करत असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी त्यांचा उल्लेख अंजली बदनामिया असा करत खिल्ली उडवली.

धनंजय मुंडे म्हणाले, दमानिया बीड जिल्हा आणि येथील लोकांना बदनाम केले. त्यांनी अनेक आरोप केले. त्यापैकी एकही सिद्ध झाला नाही. त्यांना राजकारणात पुन्हा यायचे असल्याने त्या स्वत:ची न्यूज व्हॅल्यू वाढवत असाव्यात. अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे आहेत.

धनंजय मुंडे म्हणाले, मला अंजली दमानियांच्या बुद्धीची कीव येते. कृषी खात्याची खरेदी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून झाली आहे. आता राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीची खरेदी करताना अंजली दमानिया यांना विचारुन दर ठरवायचा का? त्यांना विचारुन दर दिला तर ते योग्य, नाहीतर भ्रष्टाचार म्हणायचा का?

धनंजय मुंडे म्हणाले, अंजली दमानिया यांनी कृषी खात्यात घोटाळ्याचे आरोप केले ती निविदा प्रक्रिया 2024 मध्ये नियमानुसार आणि शासनाच्या धोरणाला अनुसरुन राबवली आहे. दमानिया गेल्या 50 दिवसांपासून माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांनी संतोष देशमुखांच्या मारेकर्‍यांचा मर्डर झाल्याचा आरोप केला होता. तोदेखील खोटा ठरला. त्या सनसनाटी निर्माण करत आहेत. यातून त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे.

मुंडे पुढे म्हणाले, डीबीटीच्या यादीत काय असावे किंवा नसावे, हे ठरवण्याचे अधिकार नियमातील तरतुदीनुसार मुख्यमंत्री यांचे आहेत. या प्रक्रियेत त्याच कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे. तत्कालीन अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यनेते खरेदी प्रक्रिया अंतिम केली होती. युरिया आणि एमएपी नॅनो खतासंदर्भात जे आरोप केले, ते वापरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. खतांची खरेदी करण्यात आलेली इक्को कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे.

परळी औष्णिक केंद्रातील राखेच्या आरोपाबाबत स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे म्हणाले, परळी औष्णिक केंद्रात तयार होणारी राख स्वत:च्या खर्चाने काढावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. माझ्या कंपनीत पत्नीला दिलेले पद शासकीय आहे का? ही कंपनी 2006 पासून अस्तित्त्वात आहे. या राखेमुळे बीड जिल्ह्यात सिमेंट इंडस्ट्री आली.

पूर्वी परळी औष्णिक केंद्रातील राख बॅगमध्ये राहत नव्हती तेव्हा राखेची तळी असायची. परळीत अशी दोन-चार राखेची तळी असून ती साफ करायला नको का? मे – एप्रिल महिन्यात परळी परिसर राखेमुळे धुळीत माखतो. ऊर्जा विभागाने म्हणावे, ही राख घेऊन जाणे बेकायदेशीर आहे. साप साप म्हणून भुई धोपटणे आणि एखाद्याचे राजकीय जीवन संपवणे सोपी गोष्ट नाही. दमानियांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी दिले त्यांना आणि दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा, असे मुंडे म्हणाले.