Eknath Shinde | दिल्ली निवडणुकीच्या निकालावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘भाजपने दिल्ली जिंकली, आता आम्ही मुंबईही जिंकू’

मुंबई: Eknath Shinde | दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. याआधीच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या आप पक्षाची मोठी पिछेहाट झाली आहे. या विजयानंतर संपूर्ण देशभरात भाजपाकडून जल्लोष केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिल्लीच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या निकालावर बोलताना ‘मुंबई महापालिकेची निवडणूक आम्हीच जिंकणार’, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ” केजरीवालांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले होते. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल अण्णा हजारेंना विसरले. त्यांच्या करणी आणि कथनीत फरक आहे. आता ‘आप’दा टळली आहे आणि दिल्लीवरचं संकट दूर झालं आहे. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत भोपळा मिळाला. त्यांची भोवळ्याची हॅट्रिक झाली.
तसेच, केंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला. घरोघरी लक्ष्मीची पावलं उमटावी म्हणून केंद्राने अनेक योजना आणल्या. या निवडणुकीच्या माध्यमातून देश आर्थिक महासत्ता होईल यावर मतदारांनी विश्वास व्यक्त केला. इंडिया आघाडी जेव्हा जिंकते तेव्हा सगळं चांगलं. इंडिया आघाडीचा पराभव झाला की संस्था भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप केला जातो. शिव्या देणं चालू होतं. लोकांना काम हवं आहे. कल्याणकारी योजना हव्या आहेत. लोकांना विकास हवा असतो”, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले, ” जनेतेने काँग्रेस, आप ला झिडकारलं आहे. मी दिल्लीला ॲडव्हान्स शुभेच्छा द्यायला गेलो होतो. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने फेक नेरेटिव्ह पसरवलं. आम्ही मात्र विकासाने लोकांची मनं जिंकली. आम्ही महापालिकेची निवडणूक जिंकणारच आहोत. गेल्या अनेक वर्षांत मुंबईकरांच्या तिजोरीची सफाई करण्यात आली आहे. आता मात्र मुंबई बदलत आहे. मुंबई लुटणाऱ्यांना मुंबईकर जागा दाखवतील. आम्ही मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार आहोत. दिल्लीतील विजयाप्रमाणे विजयाची ही परंपरा कायम सुरु राहील. हे पत्रकार परिषद घेऊन शिव्याशाप देण्यासाठी एकत्र येतात. आम्ही कामासाठी एकत्र येतो”, असा टोलाही शिंदेंनी यावेळी लगावला.
Comments are closed.