IMPIMP

Ladki Bahin Yojana | ‘लाडक्या बहिणीं’कडून सक्तीने पैसे वसूल करणार का? महिला व बालविकास विभागाचा महत्वाचा खुलासा

January 27, 2025

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा करून घाईघाईत योजना लागू देखील करून 1500 – 1500 रूपयांचे काही हप्तेदेखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले होते. मात्र, सरकार पुन्हा निवडूण आल्यानंतर आता विविध नियम, अटी लागू केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. आता या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील काही लाभार्थ्यांकडून राज्य सरकार सक्तीने पैसे वसूल करणार असे सांगण्यात आले होते. या भीतीमुळे अनेक महिलांनी योजनेतून बाहेर पडण्यासाठी फॉर्म देखील भरले आहेत.

मात्र, लाभार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर आता महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी महत्वाचा खुलासा केला आहे.

महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी म्हटले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे, अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणार्‍या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत.

विभागाने खुलासा म्हटले की, योजनेमध्ये काही लाभार्थी महिला अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिला पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळवत आहेत, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येणार नाही.

महिला व बालविकास सचिव यादव यांनी म्हटले की, विनंती केलेल्या महिलांना पैसे देण्यात येणार नसले तरी इतर लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही.

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रथम अपात्र लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेणार असल्याचे म्हटले होते, नंतर त्यांनीच घुमजाव करत आधी दिलेली रक्कम वसूल करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले, यामुळे योजनेविषयी मोठा गोंधळ महिला लाभार्थ्यांमध्ये सध्या उडाला आहे.