Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी भाजप 160-170 जागा लढवणार? शिंदे गटाच्या मागणीला ब्रेक लावण्याची मागणी
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने दबाव आणून जास्त जागा पदरात पाडून घेतल्याची भावना भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे. गेल्या काही काळात महायुतीमध्ये (Mahayuti) शिंदे गटाचा प्रभाव (Shivsena Eknath Shinde) वाढत असल्याची कुजबुजही भाजपच्या (BJP) वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या दबावाला न जुमानता १६० ते १७० जागा कोणत्याही परिस्थितीत लढायच्याच. जेणेकरुन महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येईल, असा भाजप नेत्यांचा मनसुबा असल्याचे समजते.
आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान महायुतीकडूनही रणनीती आखण्यात आली आहे. मात्र महायुतीत जागांबाबतचे दावे यावरूनचे आरोप-प्रत्यारोप दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचा वरचष्मा राहिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिक जागा मागताना दिसत आहेत.
दरम्यान शिंदे गट अधिक प्रभावी ठरत असल्याने भाजपात अस्वस्थता वाढू लागली आहे. शिंदे गटाने विधानसभेच्या जागांबाबत केलेल्या मागणीवर अंकुश लावण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये होणार असून महायुतीतील तीनही घटक पक्षांकडून जागावाटपाचा अंदाज घेतला जात आहे.
शिंदे गटाकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे १०० जागांची मागणी केली असल्याचे सांगितले जाते. ही मागणी मान्य केली तर भाजपला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील जागांपेक्षाही कमी जागा लढवाव्या लागतील. त्यामुळेच भाजपने १६० पेक्षा कमी जागा लढवू नये, अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना करण्यात आल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपने १६०-१७०, शिंदे गटाने सुमारे ७० व उर्वरित ५८ जागा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांना दिल्या जाव्यात असेही प्रदेश भाजपमधील नेत्यांनी सुचवले असल्याची माहिती मिळत आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजपने १५२ तर शिवसेनेने १२४ व इतरांनी १२ जागा लढवल्या होत्या. पण शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेची ताकदही विभागली गेली असल्यामुळे पाच वर्षापूर्वीचे जागावाटपाचे सूत्रही बदलावे लागेल. आता महायुतीमध्ये भाजप हाच मोठा भाऊ असल्याने गेल्यावेळपेक्षा कमी जागा लढवणे उचित नसेल असे मत प्रदेश भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडले असल्याचे समजते.
शिंदे गटाची १०० जागांची मागणी मान्य केली तर भाजपच्या वाट्याला जेमतेम १२०-१३० जागा येतील वा भाजपला १६० जागा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा जागांचा वाटा कमी करावा लागेल. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्यात आल्या होत्या.
मात्र, वाटणीला आलेल्या कमी जागांची भरपाई विधानसभा निवडणुकीत करण्याची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. महायुतीला मराठा मतदारांकडेही दुर्लक्ष करता येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जागावाटपातील मागणीही भाजपला डावलता येणार नाही.
त्यातून महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने महायुतीतील जागावाटपामध्ये भाजपने घटक पक्षांसमोर नरमाई न दाखवण्याची सूचना दिल्लीतील नेत्यांना केली आहे, अशी माहिती आहे.
Comments are closed.