Maharashtra Weather Update | पावसाची विश्रांती संपली! मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनने विश्रांती घेतली होती. आता मान्सून पुन्हा परतण्याची शक्यता आहे. गुरुवारी (१२ जून) मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सकाळपासूनच हवामान ढगाळ आहे. काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल.
मुंबईत सकाळी काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. दिवसभर आकाश ढगाळ राहणार असून, वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहील. हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी मुंबईसह उपनगरांना यलो अलर्ट दिला आहे.
पालघर जिल्ह्यात आजचा दिवस अंशतः ढगाळ राहणार असून, दुपारी उन्हाचा कडाका जाणवण्याची शक्यता आहे. पावसाची फारशी शक्यता नाही, मात्र दमट हवामानामुळे उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आजचा दिवस उष्णता, दमट वातावरण आणि सायंकाळी संभाव्य पावसाने भरलेला राहणार आहे. ठाणे शहरात काही भागात सकाळी वाऱ्यासह रिमझिम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नवी मुंबईत मात्र सकाळी उष्णता वाढेल आणि दुपारनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. कोकण विभागात (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड) पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत जोरदार ते अतिजोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील.
Comments are closed.