Maharashtra Weather Update | राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा; 12 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

मुंबई : Maharashtra Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढत असल्याचे संकेत आहेत. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मंगळवारी (१० जून) मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणपणे ढगाळ राहील, दुपारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर वगळता इतर कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिला नाही. परंतु, नाशिक आणि नाशिकचा घाट परिसर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात धाराशिव आणि बीड जिल्ह्याला हवामान खात्याने १० जूनसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. तर उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
विदर्भात पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील. काही जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.