IMPIMP

Maratha-OBC Reservation-Vidhan Parishad | मराठा आरक्षणावरून विधानपरिषदेत गदारोळ, मार्शल बोलवले, सभागृह तहकूब

by sachinsitapure

मुंबई : Maratha-OBC Reservation-Vidhan Parishad | मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहिले नाहीत. यावरून आज सभागृहात कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोठा गदारोळ झाला.

भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. पण ते आले नाहीत असा मुद्दा दरेकरांनी उपस्थित केला. त्यानंतर विधानपरिषदेत गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

सत्ताधारी आणि विरोधक वेलमध्ये जमा झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच उपसभापती निलम गोऱ्हे सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत होत्या. पण गदारोळ कमी झाला नाही. या गदारोळात चर्चा कशी करणार असे त्या म्हणत होत्या. आधी शांत व्हा मग बोलण्याची परवानगी देते पण कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. शेवटी मार्शलला बोलवा असे आदेशही निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिले. पण, गदारोळ थांबला नाही. शेवटी सभापती निलम गोऱ्हे यांना विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

दुसरीकडे, विधानसभेतही मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनीच सभागृहात विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. तसेच, भाजपचे आमदार अमित साटम आणि आशिष शेलार यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना धारेवर धरले.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सह्याद्री अतिथीगृहात सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. पण या बैठकीकडे राज्याचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली. त्यमुळे त्यांचे आरक्षणाबाबतचे पुतना मावशीचे प्रेम सर्वांना दिसून आले. ते सर्व जण एक्सपोज झाले असा हल्लाबोल प्रविण दरेकर यांनी केला.

Related Posts