IMPIMP

Rohit Pawar | एकनाथ शिंदेंचा सत्कार करणार्‍या पवारांवर राऊतांचा संताप, पण भाजपाला दोष देत रोहित पवारांनी दिले टीकेला सडेतोड उत्तर

February 12, 2025

मुंबई : Rohit Pawar | महाराष्ट्राचे राजकारण फार विचित्र दिशेने चालले आहे. कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, शिवसेना फोडली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते, ही आमची भावना आहे, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवारांवर संताप व्यक्त केला होता. राऊतांच्या या टीकेला आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

काल दिल्लीतील एका सोहळ्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय धुसफूस सुरू झाली असून संजय राऊत यांनी आपली नाराजी आज उघडपणे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

यानंतर आमदार रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली.

सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही. तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी, असे रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते…
संजय राऊत म्हणाले होते की, ज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांचा सन्मान आपल्या हातून करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभीमानाला धक्का आहे. कदाचित पवारांची भावना वेगळी असेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो.

संजय राऊत म्हणाले, ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळे असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचे आणि अजित पवारांचे गुफ्तगु होत असेल, पण याचे भान राखून आम्ही पुढचे पाऊल टाकतो.

संजय राऊत पुढे म्हणाले, दिल्लीत साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देतात. या लोकांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोगाला प्रश्न आहे की तुम्ही दिल्लीत दलाली करायला गेलात का? ही साहित्याची सेवा आहे का? भाजपाचा हा उपद्व्याप आहे.

मराठीची काय सेवा केली तुम्ही? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणार्‍यांचा सत्कार करता तुम्ही? हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतील दलाली आहे. मलाही याचे आमंत्रण असून मी येथे जाणार नाही. जो मराठी माणूस आहे, तो जाणार नाही, अशी नाराजी संजय राऊत यांनी व्यक्त केली. राऊतांच्या याच वक्तव्याला आता आमदार रोहित पवार यांनी वरील उत्तर दिले आहे.