Sadabhau Khot | भाजपानं तिकीट दिलं पण मतांचं काय?; सदाभाऊ खोतांची आमदारांना विनवणी

July 10, 2024

मुंबई: Sadabhau Khot | विधान परिषदेवरील ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक होत आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, असं चित्र होतं, मात्र राजकीय पक्षांनी १२ उमेदवार रिंगणात ठेवल्याने ही निवडणूक अटळ झाली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde), सदाभाऊ खोत यांच्यासह पाच उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येणार याबाबत प्रयत्न करताना दिसत आहेत.

या निवडणुकीत मोठा घोडेबाजार होणार असल्याची शक्यता लक्षात घेता आपापल्या पक्षाने आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्ष मतं जुळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना दिसत आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याच्या कारणाने पळापळ सुरु झालेली आहे. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विधान परिषद निवडणुकीत उभे असलेले उमेदवार हे आमदारांना आपल्यालाच मत देण्याची विनंती करताना पाहायला मिळत आहेत.

भाजपच्या तिकिटावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सदाभाऊ खोत हे अधिवेशनात येणाऱ्या जाणाऱ्या विधानसभा आमदारांना आपल्याला मत देण्याची विनंती करताना पाहायला मिळतात. सर्वांना नमस्कार करत “मलाच मत द्या आणि निवडून आणा” अशी विनंती करताना विधान भवन परिसरात दिसून आले आहेत. १२ जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीत सदाभाऊ खोत निवडून येतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.