Uddhav Thackeray | मनसेसोबत युती केल्यास चालेल का?; उद्धव ठाकरे यांचा बैठकीत पदाधिकाऱ्यांना सवाल, शिवसैनिक म्हणतात…

मुंबई : Uddhav Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी माहितीही समोर येत आहे. याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मनसेच्या युतीबाबत प्रश्न केला आहे.
नुकतेच उद्धव ठाकरे यांनी जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असे मोठे विधान केले होते. तसेच, मनसेसोबत युती केली तर चालेल का? असा सवालच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला आहे. यावर बैठकीत उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी मनसेसोबतच्या युतीसाठी हिरवा कंदील दिल्याचे समजते. मनसेसोबत युती केल्यास काहीच हरकत नाही. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली, तर चांगलेच असेल. तुम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू करा, असे पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे समजते.
७ जूनला मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली. सलग तीन दिवसाच्या चर्चेनंतर मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे मराठी माणसाचे गळ घालणारे पोस्टर्स पाहायला मिळत आहे. तसेच, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधुंचा एकत्र फोटो पाहायला मिळाला. त्यामुळे आगामी काही दिवसात महाराष्ट्र एक वेगळी युती होण्याची शक्यता आहे.