IMPIMP

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

July 11, 2024

मुंबई: Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार असून ही निवडणूक रंजक बनली आहे. इथे ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अशा स्थितीत क्रॉस व्होटिंगही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याठिकाणी एक अतिरिक्त उमेदवार मैदानात असल्याने नक्की कोणत्या पक्षाचा उमेदवार पराभूत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतांची गोळाबेरीज करण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे. एका -एका मताला महत्व प्राप्त झाले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान २३ आमदारांची मते मिळणे आवश्यक आहे. ११ जागांसाठी महायुतीकडून (Mahayuti) भाजप पाच (BJP), शिंदेसेना दोन (Shivsena) आणि अजित पवार गट (Ajit Pawar NCP) दोन असे नऊ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने एक उमेदवार उभा केला आहे, तर शरद पवार (Sharad Pawar NCP) यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शेकापच्या जयंत पाटील (Jayant Patil) यांना पाठिंबा दिला आहे. यात ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना मैदानात उतरवले गेल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत छोट्या पक्षांना मोठे महत्त्व आले आहे. बहुजन विकास आघाडीची (Bahujan Vikas Aghadi) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. तसेच मिलिंद नार्वेकर यांनीही हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यावेळी भाजपला साथ देतील की ठाकरे गटाच्या नार्वेकरांना याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje), शेकापचे जयंत पाटील, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर किंवा भाजपचे पाचपैकी एक यांच्यातील कोणीही एक जण पराभूत होऊ शकतो, असे म्हंटले जात आहे. नार्वेकर आणि जयंत पाटील यांचे लहानमोठ्या अन्य पक्षांमधील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. खोत, गोरखेंसह भाजपच्या पाचही उमेदवारांची मुख्य भिस्त ही पक्षाकडे असलेल्या ११२ मतांवर आहे. दरम्यान, भाजपला बाहेरून किमान ३ ते ५ मते खेचून आणावी लागतील. त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रणनीती आखली असल्याची माहिती मिळत आहे.