Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी करिश्मा नायर यांची नियुक्ती; प्राधिकरणाच्या कामकाजाला गती मिळणार

नाशिक : Nashik Kumbh Mela | नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ मेळ्यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. आता प्राधिकरणाचा शासकीय कारभार चालविण्यासाठी पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची कुंभमेळा आयुक्तपदावर नियुक्ती केली आहे. महापालिकेचे कामकाज सांभाळून नायर यांच्याकडे कुंभमेळा आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असणार आहे.
प्राधिकरणातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार अध्यक्ष म्हणजेच विभागीय आयुक्तांना असणार आहेत. जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक हे प्राधिकरणात उपाध्यक्ष असणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आयुक्त, (पदसिद्ध सदस्य) नाशिक शहर पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण, नाशिक महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, नियोजन उपायुक्त, महाराष्ट्र रस्तेविकास महामंडळ विभागीय नियंत्रक, आरोग्य उपसंचालक अशा अनेक विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सध्या बैठकांचा जोर सुरू आहे. सिंहस्थ विकासकामांसाठी महापालिकेने १५ हजार कोटींचा आराखडा सादर केला. अन्य यंत्रणांनाही ९ हजार असा तब्बल २४ हजार कोटींपर्यंत नाशिकचा आराखडा शासनाला मंजुरीसाठी सादर केला आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग वगळता अन्य विभागांना अजून निधी मिळाला नाही. सिंहस्थ दोन वर्षांवर आलेला असताना तयारी कागदावरच असून, लोकप्रतिनिधी, साधू-महंत नाराज आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली होती. अध्यादेश काढून विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली २२ सदस्यीय प्राधिकरण स्थापन केले आहे.
Comments are closed.