Jayant Patil | ‘मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा’; वर्धापन दिनी जयंत पाटील यांची मोठी मागणी

पुणे : – Jayant Patil | ‘मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा’, अशी मोठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनीच केली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना, दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे होत आहेत. अशातच जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे.
जयंत पाटील म्हणाले की, मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.
पुढे पाटील म्हणाले की, हा पक्ष स्थापन झाला, त्यावेळी शिवाजी पार्कमध्ये लाखोंचा जनसमुदाय पवार साहेबांची भूमिका ऐकण्यासाठी एकत्रित आले. १९९९ पासून २०१४ पर्यंत सतत पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिला. या राज्याच्या जडणघडणीतले अनेक निर्णय सत्तेत असताना या पक्षातल्या सगळ्या धोरणांना घेण्याचे काम केले. या १४ वर्षाच्या कालखंडात १५ वर्षाच्या कालखंडात पक्षही अतिशय सामर्थ्याने वाढवण्याचे काम झाले. पण १४ साल उजाडले भाजपची सत्ता आली आणि बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागली. पण आपण सगळे पवार साहेबांच्या मागे निष्ठेने राहिलो. तुमचे कौतुक मला यासाठीच आहे की, अनुकूल असो प्रतिकूल असो, यश मिळो अथवा न मिळो, तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली. म्हणून संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व असते.
सुप्रिया ताईंनी सिंदूर आॕपरेशनबद्दल भुमिका मांडली. त्यांचे अभिनंदन. आपले पक्षीय मदभेद असतील मात्र परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो तेव्हा या देशाच्या संरक्षणाची भूमिका पुढे मांडावी लागते. त्या ठिकाणी आपल्या पक्षाने आणि आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलेले आहे की, देश हिताची भूमिका ही सर्वप्रथम घेतली पाहिजे. शत्रूला धडा शिकवण्याची वेळ येते त्यावेळी देश एकसंघ असला पाहिजे आणि म्हणून तेव्हा तेव्हा आम्ही या देशाच्या कायम बरोबर राहण्याचे काम पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात केले, असेही जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे. आपण तुकारामांच्या बाजूचे आहोत. भाजपचे आधी दोनच खासदार होते. आज तो देशातील मोठा पक्ष आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र काम करत रहायचे आहे. राज्याचे नेतृत्व आपण करु, असेही ते म्हणाले.